उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींत ७५.२८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:50 AM2021-01-16T00:50:48+5:302021-01-16T00:51:09+5:30

७० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे अनुचित प्रकार नाही

75.28 per cent polling in six gram panchayats of Uran taluka | उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींत ७५.२८ टक्के मतदान

उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींत ७५.२८ टक्के मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
उरण : उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या ७० जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीसाठी ७५. २८ टक्के सरासरी मतदान झाले झाले होते. १६६ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले आहे. एका मतदान केंद्रावरील बंद पडलेल्या मतदान यंत्रांचा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
उरण तालुक्यातील चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली, फुंडे, वेश्वी या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. सकाळी ७ वाजता चोख पोलीस बंदोबस्तात सहा ग्रामपंचायतींच्या ४३ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात अनेक मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये मतदान करून कामावर जाण्याची घाई असलेल्या कामगारांची संख्या अधिक होती. या सहाही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपविरोधात महाआघाडी असेच लढतीचे चित्र आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर आणून सोडण्यासाठी उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते सर्रास रिक्षा, दुचाकी वाहनांचा बिनदिक्कतपणे वापर करताना दिसत होते.

निवडणुकीसाठी भाजप आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी मांडलेल्या टेबलांवरून मतदारांना स्लिप, क्रमांक देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, पुढारी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा आढावा घेताना दिसत होते. यामध्ये उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उरण पंचायत समितीचे सभापती ॲड. सागर कडू यांचा समावेश होता. 
उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये ७५.२८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती नायब तहसीलदार संदीप खोमोणी यांनी दिली. तर पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे उरणमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

एका केंद्रावर बिघाड 
चाणजे ग्रामपंचायतीच्या एका मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मतदान यंत्र काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते. त्यामुळे दहा मिनिटांचा खोळंबा झाला. मात्र बंद पडलेले यंत्र तत्काळ बदलण्यात आले. यामुळे मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. 

मतदानाची टक्केवारी
चाणजे     ७१.२९ टक्के
केगाव     ७८.२८ टक्के
नागांव     ७७.२७ टक्के
म्हातवली     ७८.९१ टक्के
फुंडे     ८७.१४ टक्के
वेश्वी     ९०.५० टक्के

Web Title: 75.28 per cent polling in six gram panchayats of Uran taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.