वर्षभरात आगीच्या ५६६ घटना, हलगर्जीपणा कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 01:37 AM2021-01-12T01:37:47+5:302021-01-12T01:38:02+5:30

वाशीत सर्वाधिक घटना

566 fires caused by negligence during the year | वर्षभरात आगीच्या ५६६ घटना, हलगर्जीपणा कारणीभूत

वर्षभरात आगीच्या ५६६ घटना, हलगर्जीपणा कारणीभूत

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रात वर्षभरात आगीच्या ५६६ घटना घडल्या आहेत. त्यात रहिवासी वास्तूंसह व्यावसायिक ठिकाणांचा सर्वाधिक समावेश आहे. आगीपासून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने बहुतांश दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रहिवासी इमारतींसह व्यावसायिक आस्थापनांकडून फायर ऑडिटला बगल दिली जात आहे. अनेकदा बांधकामाच्या सुरुवातीला अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली जाते. मात्र त्यानंतर प्रतिवर्षी त्याचे ऑडिट करून यंत्रणा सक्रिय ठेवण्यात चालढकल केली जाते. परिणामी, एखादी दुर्घटना घडल्यास तिथली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी धाव घ्यावी लागते. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याचेदेखील काही घटनांमद्ये पाहायला मिळाले आहे. अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अशा वाणिज्य आस्थापना व रहिवासी इमारतींना अग्निशमन विभागाकडून वेळोवेळी नोटीसदेखील बजावली जाते. परंतु प्रशासनाकडून कारवाईचे ठोस पाऊल उचलले जात नसल्याने फायर ऑडिटबाबतचे फारसे गांभीर्य संबंधितांकडून घेतले जात नाही. अशाच प्रकारातून वर्षभरात शहरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गतवर्षात आगीच्या एकूण ५६६ छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यात वाशी अग्निशमन विभागातील सर्वाधिक १४६ घटनांचा समावेश आहे. 

सीवूड येथील आग सर्वांत मोठी

n गतवर्षात लागलेल्या आगींमध्ये सीवूड येथे लागलेली आग सर्वांत मोठी होती. ८ फेब्रुवारीला पहाटे सी होम्स या २१ मजली इमारतीच्या 
१८व्या मजल्यावरील ही आग विझविताना सात जवान जखमी झाले
होते. 

n तर आग आटोक्यात आणण्यासाठी पाच तासांहून अधिक कालावधी लागला होता. वाशी अग्निशमन केंद्र मुख्य केंद्र असल्याने जवळपासच्या विभागात आग लागल्यास वाशी अग्निशमन केंद्राचीच मदत घेतली जाते.
 

महापालिका क्षेत्रात पाच ठिकाणच्या अग्निशमन केंद्रांमार्फत वर्षभरात आगीच्या ५६६ घटनांना वर्दी लावण्यात आली आहे. त्यात निवासी वास्तूंसह वाणिज्य आस्थापनांचा समावेश आहे. काही घटनांमध्ये तिथे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग अधिक पसरल्याचे दिसून आले आहे.
- शिरीष आरदवाड, अग्निशमन विभाग प्रमुख

 

Web Title: 566 fires caused by negligence during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.