प्रभाग आरक्षणाविषयी ५२४ हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:45 PM2020-02-12T23:45:36+5:302020-02-12T23:45:50+5:30

शुक्रवारी होणार सुनावणी : तीन प्रभागांविषयी सर्वाधिक आक्षेप, सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष

524 objections to ward reservation | प्रभाग आरक्षणाविषयी ५२४ हरकती

प्रभाग आरक्षणाविषयी ५२४ हरकती

googlenewsNext

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभाग आरक्षणावर तब्बल ५२४ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. सर्वाधिक हरकती तीन प्रभागांविषयी घेण्यात आल्या असून, यावर १४ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक विभागाने १ फेब्रुवारीला प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे. आरक्षणाचा फटका आजी-माजी महापौरांसह अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना बसला आहे. ३ ते १० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीमध्ये तब्बल ५२४ हरकती दाखल झाल्या आहेत. सर्वाधिक हरकती २१, २२ व १६ या प्रभागाविषयी आहेत. प्रभाग १६ मध्ये सद्यस्थितीमध्ये विनया मढवी या नगरसेविका आहेत. हा प्रभाग अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित झाला आहे. या प्रभागाच्या आरक्षणाला अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. प्रभाग २१ ओबीसी महिला व २२ सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित असून या दोन प्रभागांविषयीही अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. एकूण हरकतींवर १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त व ठाणे जिल्हा अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. महापालिका मुख्यालयामधील ज्ञानकेंद्रामध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे. ज्यांनी हरकती दाखल केल्या आहेत त्यांनी निर्धारित वेळेच्या १५ मिनिटेअगोदर हजर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हरकत घेतलेल्या सर्वांना पत्राद्वारे वेळ निर्धारित करून देण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पालिकेच्या स्थापनेपासून माजी मंत्री गणेश नाईक यांचे महापालिकेवर वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीमध्ये नाईक यांना महाविकास आघाडीने आव्हान दिले आहे. शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये प्रथमच महाविकास आघाडीचा प्रयोग केला जात आहे. यामुळेही सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. आरक्षणाचा फटका सर्वपक्षीय ज्येष्ठ नगरसेवकांना बसला आहे. विद्यमान महापौर जयंवत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी उपमहापौर अविनाश लाड, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी, सोमनाथ वास्कर यांच्यासह अनेक दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसला आहे. ज्येष्ठ नगरसेवकांना नवीन प्रभागांचा शोध घ्यावा लागणार आहे. गत निवडणुकीमध्ये आरक्षणामुळे निवडणुकीपासून दूर राहावे लागलेल्या दशरथ भगत व इतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आरक्षण पथ्यावर पडले आहे. आरक्षण सोडतीमध्ये सर्वाधिक फटका शिवसेनेला बसल्याचे चित्र निर्माण झाले असून आरक्षण भाजपच्या पथ्यावर पडले आहे.
कोणाला मिळणार दिलासा
आरक्षणावर अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर आरक्षणामध्ये काही बदल होणार का सुनावणीनंतर कोणाला दिलासा मिळणार? ही सोडत आहे तशीच कायम राहणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 524 objections to ward reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.