गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोची ४० हजार घरे; केंद्र सरकारचे हाऊस फॉर ऑल धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:54 PM2021-02-21T23:54:23+5:302021-02-21T23:54:27+5:30

केंद्र सरकारचे हाऊस फॉर ऑल धोरण : चालू वर्षात ८८,९६१ घरे बांधण्याचा निर्धार

40,000 houses of CIDCO on the occasion of Gudipadva | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोची ४० हजार घरे; केंद्र सरकारचे हाऊस फॉर ऑल धोरण

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोची ४० हजार घरे; केंद्र सरकारचे हाऊस फॉर ऑल धोरण

Next

कमलाकर कांबळे

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या हाऊस फॉर ऑल या धोरणानुसार सिडकोने चालू वर्षात ८८,९६१ घरे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात चाळीस हजार घरे बांधली जाणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या घरांची योजना जाहीर केली जाण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केली. 

सिडकोने परिवहन केंद्रित घरांच्या निर्मितीवर भर दिला आहे. त्यानुसार सिडकोने मागील दोन-अडीच वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे २४ हजार घरांची योजना जाहीर केली आहे. संगणकीय सोडतीत यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना कागदोपत्री संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताबापत्रेही वाटप करण्यात आली आहे. परंतु कोरोना आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे पात्रताधारकांना अद्यापी प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळालेला नाही. असे असतानाच सिडकोने आणखी ४० हजार घरांची योजना तयार केली आहे.

नवी मुंबईसह पनवेल आणि उरण परिसरातील रेल्वेस्थानकांसमोर फोर्ट कोर्टचा परिसर, ट्रक टर्मिनल आणि बस आगाराच्या जागेवर ही घरे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. यातील ३५ टक्के घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी असणार आहेत.

विशेष म्हणजे यापैकी काही ठिकाणी गृहप्रकल्पांच्या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे घरविक्रीत अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सिडकोने यावेळी विविध उपाययोजना केल्या आहेत. घरांच्या मार्केटिंगसाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. त्या माध्यमातून ही योजना अधिकाधिक लोकापर्यंत नेण्याचा सिडकोचा प्रयत्न असणार आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घरविक्रीच्या पारंपरिक धोरणात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर घरे विकण्याचा त्यांचा मानस आहे. तशा अशयाचा प्रस्ताव राज्याच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु त्यावर अद्यापी कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येऊ घातलेल्या चाळीस हजार घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्जविक्री आणि संगणकीय सोडत या जुन्याच प्रणालीचा अवलंब केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
 

Web Title: 40,000 houses of CIDCO on the occasion of Gudipadva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.