Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 11:04 AM2019-05-07T11:04:38+5:302019-05-07T11:26:04+5:30

तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे.

zero votes cast in burhan wani village during fifth phase oflok sabha Election  | Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान

Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान

Next
ठळक मुद्देतीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. बुरहान वाणीच्या गावात एकाही मतदानाची नोंद झालेली नाही. सूसाइड बॉम्बर आदिल अहमद डार याच्या गावात केवळ 15 लोकांनीच मतदान केले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (6 मे) काश्मीरमधील अनंतनाग व पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघातील हिंसाचार वगळता सर्व 51 ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. याही टप्प्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रे बंद पडल्याच्या तसेच ती नीट चालत नसल्याच्या असंख्य तक्रारी आल्या. या टप्प्यात बंगालमध्ये 74 टक्के, तर अनंतनागमध्ये 3 टक्के मतदान झाले. पुलवामा व शोपिया हा भाग अनंतनाग मतदारसंघात येतो. दहशतवाद्यांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केले होते. त्यामुळे मतदारही घराबाहेर पडायला तयार नव्हते. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रे येतात. मतदारांची संख्या सुमारे सव्वापाच लाख आहे. पण दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ 1.8 टक्केच मतदान झाले होते. हा देशातील एकमेव मतदारसंघ आहे, जिथे मतदान तीन टप्प्यांत होत आहे. याआधीच्या दोन टप्प्यांतही तिथे जेमतेम 8 ते 9 टक्के मतदान झाले होते. 

तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. बुरहान वाणीच्या गावात एकाही मतदानाची नोंद झालेली नाही. फेब्रुवारीमध्ये पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी  सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यातील सूसाइड बॉम्बर आदिल अहमद डार याच्या गावात केवळ 15 लोकांनीच मतदान केले आहे. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये इतर दहशतवाद्यांच्या गावातही कोणीही मतदान केले नसल्याची माहिती समोर येत आहे. 

अनंतनाग मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी लोकांमध्ये उत्साह नव्हता. मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन दहशतवाद्यांनी केले होते. समाजकंटकांनी काही ठिकाणी दगडफेक केली, तर एका मतदान केंद्रापाशी ग्रेनेड फेकण्यात आला. त्याच्या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. तेथील काही मतदान केंद्रांवर एक ते तीन मतदारांनीच आपला हक्क बजावला. पाचव्या टप्प्यात आतापर्यंत सर्वात कमी 63.5 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक 69.50 टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झाले तर दुसऱ्या टप्प्यात 69.44 टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात 68.40 आणि चौथ्या टप्प्यात 65.51 टक्के मतदान झाले.

Lok Sabha Election 2019 : अनंतनाग मतदारसंघामधील मतदान केंद्रे रिकामी

पुलवामा व शोपियामध्ये रस्त्यांवर मतदार नसले तरी सुरक्षा दलाचे जवान व वाहने मोठ्या प्रमाणात होती. दहशतवाद्यांच्या भीतीने गावांमधील दुकानेही बंदच होती.काश्मीरमधील पुलवामा व शोपियां या भागांत दहशतवादी सक्रिय असल्याने हा परिणाम दिसत होता. कुपवाडा जिल्ह्यातील काकापोरा या लहान शहरातही हेच दृश्य होते. तिथे एका केंद्रात मतदारांची संख्या 1039 असून, तिथे दोनच जणांनीच दहशतवाद्यांच्या धमकीला न घाबरता मतदान केले. अनेक मतदान केंद्रांत एक, दोन वा तीनच मतदार दुपारपर्यंत आले होते. लोकांना घाबरवण्यासाठी सोमवारी सकाळीच समाजकंटकांनी काही भागांत दगडफेक सुरू केली होती. अनेक घरांच्या काचा फुटल्या त्यामुळे लोक बाहेरच पडले नाहीत.
 

Web Title: zero votes cast in burhan wani village during fifth phase oflok sabha Election 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.