Yeddyurappa Vs Kumarswamy had 12 year history for Chief minister post | कुमारस्वामींना मिळतंय १२ वर्षांपूर्वीच्या 'कर्मा'चं फळ?; यावेळी येडियुरप्पांचं पारडं जड
कुमारस्वामींना मिळतंय १२ वर्षांपूर्वीच्या 'कर्मा'चं फळ?; यावेळी येडियुरप्पांचं पारडं जड

बंगळुरु : कर्नाटकमध्ये आज मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते येडीयुराप्पा प्रयत्नशील आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर तर त्यांनी गुढघ्याला बाशिंग बांधत मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत बहुमत सिद्ध न करता आल्याने पायउतार व्हावे लागले. आजच्या घडामोडी पाहून येडीयुराप्पा 12 वर्षांपूर्वीचा बदला तर घेत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतो. 


जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी आणि भाजपाचे नेते बी एस येडीयुराप्पा यांच्यातील वैर काही नवे नाही. येडीयुराप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरविल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये भाजपाशी मतभेद झाल्याने बाहेर पडत कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती. मात्र, या पक्षाला विधानसभा आणि लोकसभेत अपयश आल्याने पुन्हा त्यांनी 2013 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. यानंतर 2014 मध्ये ते  भाजपाचे खासदार झाले होते. तर खासदार पुत्राला आमदार केले होते. 


कुमारस्वामी आणि येडीयुराप्पा यांच्यातील वादाची पार्श्वभूमी ही 2007 मधील आहे. तेव्हा कर्नाटकमध्ये जेडीएस-भाजपाचे सरकार होते. त्यांच्यातील समझोत्यानुसार पहिली 2.5 वर्षे कुमारस्वामी आणि त्यानंतरची 2.5 वर्षे येडीयुराप्पा मुख्यमंत्री होतील असे ठरले होते. मात्र, जेव्हा कुमारस्वामींच्या मुख्यमंत्री पदाला 20 महिने पूर्ण झाले तेव्हा ऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिला होता. यामुळे भाजपाने आणि त्यांच्या मंत्र्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या वादानंतर पुन्हा दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आणि 12 नोव्हेंबरला येडीयुराप्पा मुख्यमंत्री झाले. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. 


नोव्हेंबरमध्ये येडीयुराप्पांनी मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यांनी कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, जेडीएसच्या वाट्याला कमी महत्वाची मंत्रिपदे आल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडली. यामुळे कुमारस्वामींनी येडीयुराप्पा सरकारचा पाठिंबाच काढून घेतला. कुमारस्वामींच्या काळात येडीयुराप्पा उप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. मात्र, येडीयुराप्पा मुख्यमंत्री बनल्यानंतर जेडीएसला मंत्रिमंडळात दुय्यम पदे देण्याचे घाटले आणि येडीयुराप्पांना अवघ्या 7 दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 
यानंतर झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत मिळाले आणि येडियुराप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र, अवघ्या 7 दिवसांत राजीनामा द्यावा लागल्याचे शल्य येडीयुराप्पांना सतावत होते. त्यातच पुन्हा 2018 च्या निवडणुकीवेळी अवघ्या 2 दिवसांत राजीनामा द्यावा लागल्याने आणि त्याचेही कनेक्शन कुमारस्वामींशीच जुळल्याने येडीयुराप्पा बदला तर घेत नाहीयेत ना अशी शंका निर्माण झाली आहे. 


Web Title: Yeddyurappa Vs Kumarswamy had 12 year history for Chief minister post
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.