Yeddyurappa to be CM, BJP MLAs meeting at 11 pm today | येडियुरप्पाच होणार मुख्यमंत्री, आज 11 वाजता भाजपाच्या आमदारांची बैठक
येडियुरप्पाच होणार मुख्यमंत्री, आज 11 वाजता भाजपाच्या आमदारांची बैठक

बंगळुरूः कर्नाटकमध्ये महिन्याभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस, जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे दिल्यानं कर्नाटक सरकार अडचणीत आलं होतं. त्यानंतर कुमारस्वामी सरकारनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यात 99 आमदारांनी सरकारच्या बाजूनं, तर 105 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे साहजिकच कुमारस्वामी सरकार कोसळलं. आता भाजपानंही कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचदरम्यान मध्यरात्री भाजपाच्या आमदारांची बैठक येडियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली एका हॉटेलमध्ये झाली. आज पुन्हा 11 वाजता ही बैठक होणार आहे. येडियुरप्पांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांना पत्र लिहून समर्थन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सदानंद गौडा यांनी येडियुरप्पाच कर्नाटकत भाजपाचे मुख्यमंत्री असतील, असं स्पष्ट केलं आहे. भाजपा नेते जगदीश शेट्टार म्हणाले, आमच्याकडे 105 आमदारांचं संख्याबळ आहे. सभागृहात बहुमत असल्यानं आम्ही सरकार बनवणार आहोत. तसेच काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामे अद्याप कर्नाटकातल्या विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारलेले नाहीत. आता ते भाजपाबरोबर जातात की नाही, येत्या काळात समजणार आहे.
येडियुरप्पांनीही या राजकीय नाट्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. जनता काँग्रेस-जेडीएस सरकारला कंटाळलेली होती. मी कर्नाटकातल्या लोकांना विश्वास देतो की, नव्या युगाची सुरुवात होईल. आमचं सरकार शेतकऱ्यांना अधिक महत्त्व देणार आहे. लवकरच आम्ही निर्णायक पावलं उचलू, असं बी. एस. येडियुरप्पा म्हणाले आहेत.

Web Title: Yeddyurappa to be CM, BJP MLAs meeting at 11 pm today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.