देशातील सर्वांना कोरोना लस मोफत देणार; आरोग्य कर्मचाऱ्यांना असेल प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 06:36 AM2021-01-03T06:36:55+5:302021-01-03T06:37:08+5:30

corona vaccine: केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन; उत्तर प्रदेशमध्ये संक्रांतीपासून (१४ जानेवारी) कोरोना लसीकरणाला प्रारंभ केला जाईल, अशी घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. देशपातळीवर कोरोना लसीकरणाची तारीख अद्याप जाहीरही झालेली नसताना, योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Will provide free corona vaccine to all in the country; Health workers will be a priority | देशातील सर्वांना कोरोना लस मोफत देणार; आरोग्य कर्मचाऱ्यांना असेल प्राधान्य

देशातील सर्वांना कोरोना लस मोफत देणार; आरोग्य कर्मचाऱ्यांना असेल प्राधान्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : देशातील सर्वांना कोरोना लस मोफत देणार, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी जाहीर केले. आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी ही लस दिली जाईल, असेही ते म्हणाले. 


त्यांनी सांगितले की, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवक व २ कोटी कोरोना योद्धे यांना लस मोफत दिली जाईल, अन्य २७ कोटी लोकांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टरांसहित आरोग्यसेवक, कोरोना योद्धे, तसेच ज्येष्ठ नागरिक आदींचा समावेश आहे. या लसीकरणाची रंगीत तालीम शनिवारी देशभरात पार पडली. दिल्लीतील दोन ठिकाणांना भेट देऊन,  आरोग्यमंत्र्ऱ्यांनी कामाची पाहणी केली. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत पसरविल्या जात असलेल्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. लसीची सुरक्षितता व परिणामकारकतेबाबत लोकांनी निश्चिंत राहावे, असेही ते म्हणाले. 

कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस
भारत बायोटेक कंपनी विकसित करीत असलेल्या कोवॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी द्यावी, अशी शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांना केली आहे. कोवॅक्सिन लस पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीस्को)ने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने कोवॅक्सिन बाबतची शिफारस केली आहे. या आधी ऑक्सफर्ड विद्यापीठ-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी, अशी शिफारस या तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली होती.

केंद्राने गरिबांना मोफत लस द्यावी - राजेश टोपे
जालना : कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज आहे. त्या अनुषंगाने राज्यात लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम घेतली जात आहे. देशातील एका कंपनीची लस तयार असून, लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल, केंद्र सरकारने गरिबांना मोफत लस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तथापि, ती न दिल्यास राज्य सरकार त्यांना लसीपासून वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीला ड्रग अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे. परवानगी मिळाल्यास राज्यातील प्रशासन  लसीकरणासाठी सज्ज असल्याचेही टोपे यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशात संक्रांतीचा मुहूर्त 
उत्तर प्रदेशमध्ये संक्रांतीपासून (१४ जानेवारी) कोरोना लसीकरणाला प्रारंभ केला जाईल, अशी घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. देशपातळीवर कोरोना लसीकरणाची तारीख अद्याप जाहीरही झालेली नसताना, योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मी कोरोना लस टोचून घेणार नाही, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी जाहीर केले. भाजप सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनातून ९९ लाखांहून अधिक झाले बरे
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. शनिवारी २० हजारांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण आढळून आले. या संसर्गातून ९९ लाखांपेक्षा अधिक जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.१२ टक्के आहे. सध्या अडीच लाख रुग्णांवरच उपचार सुरू आहेत.

Web Title: Will provide free corona vaccine to all in the country; Health workers will be a priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.