‘यूपीए’ आता आहेच कुठे ? ममता बॅनर्जींचा सवाल; शरद पवार यांच्याशी पर्यायांविषयी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 07:36 AM2021-12-02T07:36:26+5:302021-12-02T07:37:58+5:30

Mamata Banerjee News: ‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेनंतर बुधवारी दिले.

Where is the UPA now? Mamata Banerjee's question; Discussion with Sharad Pawar about options | ‘यूपीए’ आता आहेच कुठे ? ममता बॅनर्जींचा सवाल; शरद पवार यांच्याशी पर्यायांविषयी चर्चा

‘यूपीए’ आता आहेच कुठे ? ममता बॅनर्जींचा सवाल; शरद पवार यांच्याशी पर्यायांविषयी चर्चा

Next

मुंबई : ‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेनंतर बुधवारी दिले. या भेटीनंतर दोघांनीही पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार यांच्याकडे आपण यूपीएचे नेतृत्व देणार का, असा प्रश्न विचारला असता ममता बॅनर्जी यांनी, पर्यायाच्या नेतृत्वाबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्याच वेळी शरद पवार यांनी ‘भाजपला मजबूत पर्याय देताना काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही ुढे जाणार आहोत’, अशी भूमिका मांडली.

भाजपला पर्याय देऊ शकेल आणि ज्यावर लोकांचा विश्वास आहे अशा रस्त्याने आम्ही जाऊ. आमच्यात नेतृत्वाचा विषय नाही. नेतृत्व कोणाचे ही दुय्यम बाब आहे, असेही पवार म्हणाले. काँग्रेसच्या नेतृत्वात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) कार्यरत असताना ममता यांनी,‘आता यूपीए अस्तित्वात नाही’ असे विधान करून पुढील काळात काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए ऐवजी भाजप विरोधात अन्य पर्याय उभा करण्याचे सूचित केले.

सिल्व्हर ओक या पवार यांच्या निवासस्थानी दोघा नेत्यांची तासभर चर्चा झाली. प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या शरद पवार यांना भेटल्या. मुंबईच्या दौऱ्यात त्यांनी एकाही काँग्रेस नेत्याशी चर्चा केली नाही. यावरूनही त्या काँग्रेसला वगळून भाजपविरोधात आघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आरोग्य लवकरच ठणठणीत होवो, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते, या शब्दांत बॅनर्जी यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

ममता म्हणाल्या...
-‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही.’
- फॅसिझमच्या विरोधात मजबूत पर्याय द्यावा लागेल.
- कोणताही नेता विदेशात राहणार असेल तर, भाजपशी कसे काय लढणार?, फिल्डमध्ये राहूनच लढावे लागेल. 

सामूहिक नेतृत्वाची रणनीती
-यूपीए अस्तित्वात नसल्याच्या ममता बॅनर्जी यांच्या विधानाला शरद पवार यांनी छेद दिला नाही. काँग्रेसच्या नेतृत्वातच भाजपला पर्याय दिला जाईल, असेही पवार यांनी म्हटले नाही. 
- सामूहिक नेतृत्वाची संकल्पना मांडत त्यांनी  ममता यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे समजते. सामूहिकरित्या भाजपच्या विरोधात उभे राहावे व काँग्रेसने त्यात सहभागी व्हावे, अशी ममता व पवार यांची रणनीती दिसत आहे. 

शरद पवार म्हणाले...
-फिल्डमध्ये राहूनच जिंकता येते, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे.
-पश्चिम बंगालमध्ये त्यांनी व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी ते सिद्धदेखील केले आहे.
-समविचारी पक्षांनी आज आणि २०२४ च्या लोकसभा 
निवडणुकीतही भाजपच्या विरोधात एकत्र आले पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

काँग्रेसविना भाजपचा पराभव हे दिवास्वप्नच
काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय भाजपचा पराभव करण्याची भाषा कोणी करीत असेल, तर ते दिवास्वप्नच ठरेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. सध्या जवळपास सर्वच विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचा भाग आहे. तरी ममता यांनी हे वक्तव्य केल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली. वेणुगोपाल म्हणाले की, भारतीय राजकारणाची ज्यांना माहिती आहे, त्यांना काँग्रेसविना भाजपशी लढता येणे शक्य नाही, हे समजते. काँग्रेसविना भाजपच्या पराभवाचा विचार हे दिवास्वप्नच ठरेल.

Web Title: Where is the UPA now? Mamata Banerjee's question; Discussion with Sharad Pawar about options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.