‘ह्युमॅनिटी’ काय असते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 09:51 IST2025-12-07T09:48:20+5:302025-12-07T09:51:08+5:30
मुद्द्याची गोष्ट : परदेशात राहणारे किंवा पर्यटनासाठी गेलेले भारतीय जेव्हा अशा एखाद्या संकटात सापडतात तेव्हा आपल्या नौदलाने किंवा हवाईदलाने त्यांना ‘रेस्क्यू’ करून आणल्याच्या बातम्या आपण सगळेच वाचतो. पण प्रत्यक्ष त्यात अडकलेल्यांना वाचल्यानंतर येतो 'ह्युमॅनिटी'चा अनुभव... असाच हा अनुभव... ‘ह्युमॅनिटीज’ शिकवणारा...

‘ह्युमॅनिटी’ काय असते?
अभिरुची ओक, राधिका साव,
कविता पटेल, रिया वेलिंगकर, सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या स्कॉलर्स
श्रीलंकेतील केलेनिया विद्यापीठात होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ह्युमॅनिटीज’साठी जायचा निर्णय घेतला तेव्हा हा दौरा काहीतरी अनपेक्षित अनुभव देणारा असेल आणि एखाद्या सिनेमात बघतो तसा काहीसा थरार आपण प्रत्यक्ष अनुभवून परत येऊ अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती. कॉन्फरन्सला जातोच आहोत तर श्रीलंकेतील वारसास्थळे पाहण्याची संधी आम्हाला चुकवायची नव्हती. त्यामुळे कॉन्फरन्सच्या तीन दिवस आधीच आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही पोहोचल्यापासून श्रीलंकेत पाऊस होताच. त्या तसल्या रिपरिप पावसात आम्ही आमचं ‘हेरिटेज साईटसिइंग’ करत होतो. पावसाचा जोर वाढत होता तरी आमच्या कॉन्फरन्सचा श्रीगणेशा झाला. पहिल्या दिवशीचं उद्घाटन सत्र, तज्ज्ञांची व्याख्यानं हे सगळं ठरल्याप्रमाणे पार पडलं. आम्ही अनुराधापुरा, सिगिरिया अशा वारसास्थळांचं सौंदर्य अनुभवण्यात रमलो होतो तेव्हा दुसरीकडे ‘दित्वाह’ नावाचं एक चक्रीवादळ श्रीलंकेच्या उंबरठ्यावर होतं पण त्याचं गांभीर्य आम्हाला जाणवलं ते दुसऱ्यादिवशी आमची कॉन्फरन्स रद्द होणार हे कळलं तेव्हा!
दित्वाह चक्रीवादळ श्रीलंकेत पोहोचलं तसा तो संपूर्ण देश हादरला. प्रचंड वेगाने वाहणारे वारे, वीज गेल्याने सर्वत्र पसरलेला अंधार, उन्मळून पडलेल्या झाडांमुळे ठप्प होणारी वाहतूक, अशी सर्वत्र गोंधळाची परिस्थिती होती. यापूर्वी त्सुनामीचा अनुभव घेतलेल्या तेथील लोकांनी या वादळाचा धसकाच घेतला, पण गेल्या सत्तर वर्षात असा पाऊस पाहिला नाही असं स्थानिक लोक म्हणत होते आणि पर्यटकांना लवकरात लवकर सुरक्षित विमानतळापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास त्यांना लागला होता. भारतात आमच्या कुटुंबियांनाही चिंतेने ग्रासलं होतं. टूर मॅनेजरने आम्हाला तातडीने विमानतळावर पोहोचवण्याची व्यवस्था केली. पण तिथे जात असताना रस्त्याच्या दुतर्फा पाण्याखाली गेलेली गावं दिसत होती. आम्ही विमानतळावर सुखरुप पोहोचलो खऱ्या, पण तिथे पोहोचल्यावर या संकटाचं गांभीर्य आम्हाला जाणवलं. श्रीलंकन एअरलाइन्सची काहीतरी तांत्रिक गडबड झाली होती. त्यामुळे अनेक उड्डाणं रद्द झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माणसांची गर्दी होती. विमानतळावर हॉटेल्स एका रात्रीचे १०० डॉलर घेत होती, त्यामुळे खर्च परवडणार नव्हता ते सगळे विमानतळावरच आश्रयाला होते.
संकटात मदतीला आले ‘ऑपरेशन सागर बंधू’; ‘रेस्क्यू फ्लाइट’ची घोषणा झाली अन्...
विमानांच्या ‘रिशेड्युलिंग’ साठीही रांगा होत्या. तरी भारतीय नागरिक एकमेकांच्या आधाराने त्याही परिस्थितीत खंबीर होते. अशा आणीबाणीच्या प्रसंगात इंडियन हाय कमिशनच्या छोट्या काऊंटरचा मात्र आम्हाला खूप आधार वाटला. ‘ऑपरेशन सागर बंधू’ या मोहिमेखाली त्यांनी मायभूमीपासून लांब येऊन या अस्मानी संकटात सापडलेल्या सगळ्यांच्या खाण्यापिण्याची काळजी तर घेतलीच, पण मुख्य म्हणजे आम्हाला प्रचंड धीर दिला. तशात ‘रेस्क्यू फ्लाइट’ ची घोषणा झाली तेव्हा मनात उठलेल्या भावनांचा कल्लोळ शब्दांत मांडता येणं केवळ अशक्य आहे.
परदेशात राहणारे किंवा पर्यटनासाठी गेलेले भारतीय जेव्हा अशा एखाद्या संकटात सापडतात तेव्हा आपल्या नौदलाने किंवा हवाईदलाने त्यांना ‘रेस्क्यू’ करुन आणल्याच्या बातम्या आपण सगळेच वाचतो. त्या बातम्या वाचतो तेव्हा अभिमानाने आणि सैन्यदलांप्रतीच्या कृतज्ञतेने आपला उरही भरुन येतो. पण त्या रेस्क्यू होणाऱ्या भारतीयांच्या गटामध्ये आपण स्वतःच असतो तेव्हाची गोष्ट वेगळी असते. पण भारतीय म्हणून आम्ही तिथे एकत्र असणं, मोबाइल चार्जर, स्वतःजवळ असलेला खाऊ शेअर करत एकमेकांना धीर देणं हे सगळं एकाबाजूला सुरु असताना निव्वळ मराठी, हिंदीत बोलता येईल असे लोक आजूबाजूला आहेत, ही भावनाही दिलासा देणारी होती.
‘तो’ साडेचार तासांचा विमान प्रवास...
दुसऱ्या दिवशी दुपारी अखेर आम्हाला रेस्क्यू करण्यासाठी आलेलं भारतीय हवाई दलाचं एक अवाढव्य विमान आमच्या नजरेस पडलं. त्याक्षणी ते विमान आणि भारतीय हवाईदलाचे अधिकारी, कर्मचारी हे आम्हाला देवदुतासमान भासले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
आपल्याला सिव्हिल एअरलाइन्सच्या विमानांमधून केलेला आलिशान, सुखकर विमान प्रवास माहिती असतो, पण हवाईदलाच्या विमानातून काहीशी गैरसोय सहन करत केलेला तो साडेचार तासांचा विमान प्रवास मात्र आयुष्यभर स्मरणात राहील असा होता.
विमान टेकऑफ साठी सज्ज झालं तेव्हा प्रवासी, भारतीय आणि श्रीलंकन हवाईदलाचे अधिकारी, कर्मचारी अशा सगळ्यांच्याच तोंडून “भारत माता की जय!” अशी उत्स्फूर्त घोषणा दिली गेली. भारताने केलेल्या आपत्कालीन मदतीप्रती त्यांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता आम्हाला भावली. या सगळ्या प्रवासात आमचे कुटुंबीय, सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या डायरेक्टर डॉ. पल्लवी नलावडे जांभळे यानी आम्हाला दिलेला धीरही आम्ही कधीही विसरु शकत नाही.
‘ह्युमॅनिटीज’ या आमच्या अभ्यास विषयाचे काही नवे पैलू शिकण्याची संधी म्हणून आम्ही श्रीलंकेतील त्या कॉन्फरन्सला गेलो, परत आलो
ते मात्र एक आगळी वेगळी ‘ह्युमॅनिटी’ अनुभवून!