गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 21:40 IST2025-12-07T21:36:56+5:302025-12-07T21:40:33+5:30
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत क्लबच्या चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
गोव्याची राजधानी असलेल्या पणजीतील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमधील भीषण अग्निकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत 25 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या खुलाशानुसार, इलेक्ट्रिक फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत क्लबच्या चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लबचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोदक, महाव्यवस्थापक विवेक सिंह, बार व्यवस्थापक राजीव सिंघानिया आणि गेट व्यवस्थापक रियांशु ठाकुर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांविरोधात निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सावंत यांनी पोलीस महासंचालक आलोक कुमार यांना या प्रकरणात कोणतीही हयगय न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन होऊनही क्लबला काम करण्याची परवानगी दिली, त्यांनाही त्वरित निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कँडावेलू आणि डीजीपी यांना दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भीषण दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, अग्निशमन सेवा उपसंचालक आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे संचालक यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती एका आठवड्यात आपला अहवाल सादर करेल.
मुख्यमंत्री सावंत यांनी पीडितांना मदत जाहीर केली असून, प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना ₹5 लाख आणि जखमींना ₹50 हजार रुपयांची मदत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निधीतून दिली जाईल. तसेच, मृतांचे पार्थिव त्यांच्या घरापर्यंत पाठवण्याची व्यवस्था सरकार करेल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व नाईट क्लब आणि गर्दीच्या ठिकाणी कठोर सुरक्षा नियमावली जारी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.