कर्तव्यादरम्यान झाला वाद; बीएसएफ जवानाने सहकाऱ्यावर झाडल्या १३ गोळ्या, रुग्णालयात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:01 IST2025-06-15T11:59:39+5:302025-06-15T12:01:01+5:30
पश्चिम बंगालमध्ये कर्तव्यादरम्यान बीएसएफ जवानाने त्याच्या सहकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली.

कर्तव्यादरम्यान झाला वाद; बीएसएफ जवानाने सहकाऱ्यावर झाडल्या १३ गोळ्या, रुग्णालयात मृत्यू
West Bengal:पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा सीमा सुरक्षा बलाच्या जवानाने सहकाऱ्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचारग्रस्त भागात कर्तव्यावर असताना एका बीएसएफ जवानाची दुसऱ्या बीएसएफ जवानाने गोळ्या घालून हत्या केली. कर्तव्यादरम्यान दोघांमध्ये झालेल्या वादानंतर जवानावर त्याच्या सहकाऱ्याने गोळी झाडली. जवानावर एकूण १३ गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मृत जवानाचे नाव रतन लाल सिंग (३८) असे आहे. राजस्थानचा रहिवासी असलेला आरोपी बीएसएफ जवान एस.के. मिश्रा याला मुर्शिदाबादच्या शमशेरगंज पोलिसांनी अटक केली. ही घटना धुलियान नगरपालिकेत रात्री १०:३० च्या सुमारास घडली. राजस्थानमधील आणि बीएसएफच्या ११९ व्या बटालियनमध्ये तैनात असलेले आरोपी एसके मिश्रा याने जोरदार वादानंतर त्यांच्या इन्सास रायफलमधून १३ गोळ्या झाडल्या. त्यापैकी किमान पाच गोळ्या रतन लाल सिंग (३८) यांना लागल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुर्शिदाबादच्या सर्व हिंसाचारग्रस्त भागात बीएसएफ तैनात करण्यात आले होते. दोन्ही सैनिक सीमा सुरक्षा दलाच्या ११९ व्या बटालियनमध्ये तैनात होते. शनिवारी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका सैनिकाने दुसऱ्यावर गोळीबार केला. जखमी बीएसएफ जवानाला आधी अनुपनगर रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती अधिक खालवल्याने जांगीपूर उपविभागीय रुग्णालयात हलवण्यात आले. जांगीपूर उपविभागीय रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी बीएसएफ जवानाला मृत घोषित केले.
गोळीबारानंतर एसके मिश्रा सापडला नाही. मात्र नंतर शमशेरगंज पोलिसांनी मिश्राला बंदुकीसह पोलीस ठाण्यात आणले आणि त्याला अटक केली. बीएसएफ अधिकाऱ्यांनीही मिश्रा पोलिसांना सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे.