We want strong, but opponents 'forced government'! | आम्हाला मजबूत, विरोधकांना ‘मजबूर सरकार’ हवे!
आम्हाला मजबूत, विरोधकांना ‘मजबूर सरकार’ हवे!

नवी दिल्ली : देशाला मजबूत सरकार मिळावे, असे भाजपाला वाटते, परंतु विरोधकांना मात्र केंद्रात मजबूर (लाचार) सरकार हवे आहे, ज्यामुळे त्यांना देशाला लुटता येते, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावर भरलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी केली. देशात पहिल्यांदाच असे सरकार आहे, ज्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही, असा दावा मोदी यांनी केला. भ्रष्टाचार न करताही देश चालविता येतो, हे आम्ही दाखवून दिले, असेही ते म्हणाले.


काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, देशाच्या विकासातील काँग्रेस हा प्रमुख अडथळा आहे. घोटाळे आणि भ्रष्टाचारामुळे यूपीए सरकारच्या काळात देशाची महत्त्वाची १० वर्षे वाया गेली. हताश झालेले विरोधक माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत, परंतु त्यामुळे मी अजिबात मागे हटणार नाही.


गांधी परिवारावर टीका करताना मोदी म्हणाले की, जे स्वत: जामिनावर बाहेर आहेत, देशाचा न्याय आणि कायदा याचा मान राखत नाहीत, त्यांच्याकडून देशाचा सन्मान केला जाईल, ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. काँग्रेससाठी आरबीआय, कॅग, सीबीआय या सर्व संस्था क्षुल्लक आहेत. केवळ परिवार हेच सर्वस्व आहे. परिवाराला विरोध करणारे सगळे चूक आहेत. यापुढे खरी लढाई परिवार आणि राज्यघटना यांच्यामध्ये आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांनी या संस्थांचा वापर करून मला संपविण्याचा प्रयत्न केला. माझी सलग नऊ तास चौकशी केली. त्यांनी अमित शहा यांना तुरुंगात टाकले.


अयोध्येतील राम मंदिरप्रकरणी मोदी म्हणाले की, काँग्रेसने वकिलांकडून राम मंदिर बांधण्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी बेछूट आरोप करीत काँग्रेसने देशाच्या सरन्यायाधीशांवर महाभियोग आणण्याची तयारी चालविली होती. देशहिताच्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्याला विरोध करण्याची काँग्रेसची मानसिकता यातून दिसून येते. सरकारने केलेल्या कामांबाबत मोदी म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वाखाली देश पारदर्शकतेच्या दिशेने जात आहे. २०१४ आधी देशात सामान्य माणूस भरीत असलेल्या कराला काहीही किंमत नव्हती. आता स्थिती बदलली आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन, चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या की त्यांना कुणावर अवलंबून रहावे लागत नाही.


संसदेच्या अखेरच्या अधिवेशनात सर्व वर्गातील आर्थिक दुर्बलांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण मोदी सरकारने लागू केले. याबाबत मोदी म्हणाले की, या आरक्षणामुळे देशात समानता आणण्यास मोठी मदत मिळेल. यामुळे दुर्बल घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. हे देताना सरकारने अन्य कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला अजिबात धक्का लावलेला नाही.


नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना कार्यकर्ते त्यांच्या नावाचा जयघोष करीत होते. मोदी यांच्या भाषणचा एकूण नूर पाहता त्यांनी काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा निश्चित केली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी जोरदार कामाला लागा, असा संदेशच त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिला आहे.

विरोधकांच्या आघाड्या तकलादू
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केल्याची घोषणा आज सकाळीच झाली. याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, या आघाड्या अजिबात टिकू शकणाऱ्या नाहीत. तेलंगणात काँग्रेसने चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशमशी आघाडी केली परंतु प्रत्यक्षात तिथे तेलंगण राष्ट्रसमितीची सरशी झाली. कर्नाटकात काँग्रेसने जनता दल (सेक्युलर) यांच्यासोबत आघाडी करून त्यांना मुख्यमंत्रिपद दिले परंतु आज मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी उघडपणे सांगत आहेत की, काँग्रेस त्यांना कारकूनाप्रमाणे वागवले जात आहे.


राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये स्थापन झालेल्या नवीन सरकारमध्येही आता अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये शेतकºयांना कर्जमाफी दिली. कारण अन्नदात्या शेतकºयांना काँग्रेस केवळ मतपेढी मानते. परंतु या शेतकºयांना हे ठाऊक आहे की शेतमालाला दिला जाणारा चांगला हमीभाव अजूनही कागदावरच आहे. पण आमचे सरकार सत्तेत येताच आम्ही शेतकºयांना हमीभाव वाढवून दिला.

सेवक हवा की...?
तुम्हाला १८ तास काम करणारा सेवक हवा आहे की, अडचणीच्या काळात देशाला गरज असताना सुट्टीवर जाणारा नेता हवा आहे, असा सवाल मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता विचारला.


Web Title: We want strong, but opponents 'forced government'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.