Arvind Kejriwal Interview: आम्ही धारावीकडून काही गोष्टी शिकलो; आता देशाने ‘दिल्ली मॉडेल’ स्वीकारावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 07:10 AM2020-07-30T07:10:37+5:302020-07-30T10:29:48+5:30

Arvind Kejriwal Interview: कोरोनाला थोपविण्यासाठी देशाने आता दिल्ली मॉडेलमधील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले.

We learned a few things from Dharavi on corona Virus: Arvind kejariwal | Arvind Kejriwal Interview: आम्ही धारावीकडून काही गोष्टी शिकलो; आता देशाने ‘दिल्ली मॉडेल’ स्वीकारावे!

Arvind Kejriwal Interview: आम्ही धारावीकडून काही गोष्टी शिकलो; आता देशाने ‘दिल्ली मॉडेल’ स्वीकारावे!

Next
ठळक मुद्देकॉँग्रेस-भाजप बाजारात बसली आहे. आमदारांची खरेदी-विक्री करून सरकार पाडणे व बनविण्याचा धंदा सुरु केलाय.चीनने आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून देशाचा अपमान केलाय.प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे, प्राथमिकता गरिबांचा जीव वाचविण्यास द्यावी.

>> विकास झाडे

नवी दिल्ली : देशाला कोरोनाचा विळखा आहे. यातून दिल्ली सुटली नाही. दुसऱ्या क्रमांकावर होती. येथील स्थिती हाताबाहेर जाण्याचे भय होते. आम्ही खूप संयम ठेवला. मुंबईतील धारावी आटोक्यात येत गेली, त्यातून काही गोष्टी शिकता आल्यात. तज्ज्ञांना सहभागी करून ‘दिल्ली मॉडेल’ तयार केले. महिनाभरात जे सकारात्मक बदल झाले त्याचे चित्र जगापुढे आहे. दिल्ली दहाव्या क्रमांकावर गेली. कोरोनाला थोपविण्यासाठी देशाने आता दिल्ली मॉडेलमधील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले.

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिलीत.

* दिल्लीने प्लाझ्मा थेरपीचा नवीन आदर्श देशापुढे ठेवला तुम्ही याकडे कसे पाहता?

>> मला अनेक ठिकाणाहून माहिती मिळाली होती की, प्लाझ्मा उपचारामुळे जगातील रुग्ण दुरुस्त होत आहेत. एलएनजेपी रुग्णालयास प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून केंद्र सरकारकडे विनंती केली. प्लाझ्मा उपचार करणारे हे देशातील पहिले रुग्णालय ठरले. डॉक्टरांनी खूप परिश्रम घेतले. रुग्णही बरे व्हायला लागले. आता प्लाझ्माची मागणी वाढली आहे. त्यामुळे दिल्ली सरकारच्या आईएलबीएस रुग्णालयात देशातील पहिली प्लाझ्मा बॅँक सुरु करण्यात आली. मला आनंद या गोष्टीचा होतो की दुरुस्त झालेले रुग्ण स्वत: तिथे जाऊन प्लाझ्मा दान करतात.

* दिल्लीतील रिकव्हरी रेट ८८ टक्यांच्या वर आहे. आता कोरोना विरोधातील लढाई संपली का?

>> दिल्लीत जून महिन्यात स्थिती खूप वाईट होती. लॉकडाऊन संपले तेव्हा मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली. तज्ज्ञांच्या मदतीने नियोजन केले. आता दिल्लीतील स्थिती आटोक्यात आली आहे. दिल्लीतील ८८ टक्के रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. आम्ही तीन पातळ्यांवर काम केले. कोरोनासोबत एकट्याने लढून चालणार नव्हते. आम्ही केंद्र सरकार, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, दिल्लीतील खासगी रुग्णालये, हॉटेल आदींची मदत घेतली. आमच्यावर विरोधी पक्षाने टिका केली तेव्हा त्यांना आम्ही प्रत्युत्तर न देता त्याला आमची शक्ती समजून आमच्यातील त्रुटी दुरुस्त करीत गेलो.  शेवटी ‘हरायचे नाही तर जिंकायचे’ हे सूत्र ठरवूनच आम्ही २४ तास काम करीत आहोत. लढाई आम्ही जिंकलो असे म्हणणे घाईचे ठरेल. पुन्हा बराच मोठा टप्पा गाठायचा आहे.

* दिल्लीतील लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली असे तुम्हाला वाटते का?

>> होय, निश्चितच. सिरो सर्व्हेक्षणाला आपण सामूहिक रोगप्रतिकार शक्ती वाढण्याच्या अनुषंगाने पाहावे. दिल्लीतील सर्व्हेक्षणात २४ टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढणारी रोगप्रतिकारशक्ती दिसून आली आहे. हे सर्व्हेक्षण १० जुलैपर्यंतचे आहे. आज ३०-३५ टक्के लोकांमध्ये एंटीबॉडीज विकसित झाल्या असतील.

* सरकारी रुग्णालयातच उपचार घ्यावा असे तुम्ही दिल्लीकरांना आवाहन करीत असता मग आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचाराची वेळ का आली?

>> सत्येंद्रजींवर राजीव गांधी सुपर स्पेशियालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा डॉक्टरांनी प्लाझ्मा थेरपीचा निर्णय घेतला. त्यावेळी केंद्र सरकारने या रुग्णालयास प्लाझ्मा उपचाराची परवानगी दिली नव्हती. त्यांच्या कुटुंबियांनी निर्णय घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलविले व त्यांच्यावर तातडीने फ्लाझ्मा उपचार करण्यात आले.

* महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातही तीच स्थिती आहे. यासाठी सार्वत्रिक भूमिका काय असावी?

>> देशातील सगळेच राज्य तेथील परिस्थितीनुसार उत्तम काम करीत आहेत. आम्हाला विलगीकरणाचा चांगला फायदा मिळाला. केंद्र सरकारने सुरुवातीस घरी विलगीकरणास बंदी घातली. लोकांनी विरोध केल्यानंतर आदेश मागे घ्यावा लागला. हा आदेश मागे घेतला नसता तर दिल्लीतील स्थिती हाताबाहेर गेली असती. आज अन्य राज्यांतील लोकांना हीच भिती आहे, कोरोना पॉझिटिव्ह निघालो तर सरकार उचलून नेईल. त्यामुळे अनेकजण कोरोनाचे लक्षण आले तरी तपासणी करीत नाहीत. दिल्लीत ज्यांना आम्ही घरीच विलगीकरणात ठेवले त्यांची डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. त्यांना आम्ही ऑक्सीमीटर दिले आहे. रुग्णांचे ऑक्सिजन तपासणे महत्त्वाचे आहे. दिल्लीत दररोज २० हजार तपासण्या करीत आहोत.  दहा लाख लोकांमागे ५० हजार तपासण्या करण्याचा उच्चांक आम्ही गाठला. अधिक तपासण्या होतील तेव्हाच संक्रमित रुग्ण शोधले जाऊ शकतात. दिल्लीत खाटांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली. लोकांचा सरकारी यंत्रणेवरचा विश्वास वाढल्याने चांगले बदल दिसून आलेत.

* दिल्लीतील मजूर आपापल्या राज्यात परतले, आता स्थिती सुधारत असताना येथील अडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी त्यांना परत आणण्यासाठी काय योजना आहे?

>> तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत जेव्हा कोरोना वाढत होता तेव्हा येथील मजूर आपापल्या गावाकडे परतले. दिल्लीतील स्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येत असल्याने सर्व मजूर परत येत आहेत. त्यांना काम शोधायला त्रास होऊ नये म्हणून दिल्लीकरांना त्यांना मदत करावी लागेल. ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात आणि ज्यांचे उद्योग सुरु झालेत. परंतु मनुष्यबळ नाही अशांच्या मदतीसाठी दिल्ली सरकारने ‘रोजगार बाजार’ ही मोहीम सुरू केली आहे. एक दिवसात या संकेतस्थळावर दोन लाखांवर नोंदणी झाली आहे. दिल्लीतील उद्योग आणि निर्माण कार्य पूर्ववत होत आहेत. शिवाय इथली आर्थिक घडीही पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे.

* दिल्लीतील परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे श्रेय केंद्र सरकार घेत आहे!

>> मला वाटते श्रेय घेण्याची ही वेळ नाही. मी अनेकदा म्हटले, दिल्लीत ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे सर्व श्रेय त्यांना ( भाजप, केंद्र सरकार) आणि संपूर्ण जबाबदारी माझी. मुख्यमंत्री असल्याने मला ही जबाबदारी स्वीकारावीच लागेल. कोरोनाशी लढण्याकरीता मी सगळ्यांकडेच गेलो, केंद्रालाही मदत मागितली. त्यांनी आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटीलेटर, टेस्टिंग आदी बाबी उपलब्ध करून दिल्यात. सगळ्यांना मिळून लढावे लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. मला कोणत्याही श्रेयाच्या राजकारणात पडायचे नाही.

* एकीकडे संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देतोय. दुसरीकडे राजस्थानचे सरकार पाडण्याच्या प्रयत्न सुरू आहे, तुम्ही याकडे कसे पाहता?

>> चीन आमच्या भूक्षेत्रात आलाय, कोरोना संपूर्ण देशात आहे. अशा वेळी कोणत्याही सत्ताधारी पक्षाने निवडून आलेल्या राज्य सरकारांमध्ये हस्तक्षेप करू नये. मला माहिती अशी मिळाली की,  २२ मार्चला लॉकडाऊन यासाठी लावण्यात आले की त्यांना मध्य प्रदेशात सरकार बनवायचे होते. आमदार विकत घेऊन सरकार पाडणे हे चांगले राजकारण नाही. हा मतदारांचा विश्वासघात ठरतो. कोणती पार्टी आमदार विकत घेऊन मतदारांचा विश्वास तोडत असेल तर ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. काँग्रेसची काय स्थिती आहे याचाही अंदाज येतो. गोव्यात लोकांनी काँग्रेसला मते दिलीत, काँग्रेसने ते भाजपला विकून टाकले. कर्नाटकात लोकांनी काँग्रेसचे सरकार बनवले, मात्र काँग्रेसने सत्तेची माळ भाजपच्या गळ्यात टाकली. मध्य प्रदेशात लोकांनी काँग्रेसला मते दिलीत, काँग्रेसने ही मते भाजपला विकली. आता काँग्रेसला मत देणे म्हणजे काँग्रेस आपली मते विकून भाजपचे सरकार बनवणे असे समीकरण झाले आहे. दोन्ही पक्ष दोषी आहेत. बाजारात बसले आहेत आणि एक विकायला तर दुसरा खरेदी करण्यास तयार आहे.

* भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांत राज्यपाल आणि उपराज्यपाल केंद्र सरकारच्या दबावात काम करते असे म्हटल्या जाते, तुमचा काय अनुभव आहे?

>> राज्यपाल किंवा उपराज्यपाल पद ही एक संविधानिक अस्मिता आहे. त्यांनी नि:पक्षपणे काम करावे. आमच्या मागच्या टर्ममध्ये असाच वाद झाला. आम्ही घेतलेले कोणत्याही निर्णयांना तत्कालीन नायब राज्यपाल मान्यता देत नव्हते. निवडून आलेल्या सरकारच्या निर्णयाबाबत नायब राज्यपालांची भूमिका विरोधी असल्याने आम्हाला न्यायालयात जावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये आमच्या बाजुने निकाल दिला. त्यानंतर एक दोन विषय सोडले तर आमचे सर्व मुद्दे मान्य होत गेले. आता तर त्यांचे सहकार्य मिळत असते. घरी विलगीकरणाच्या मुद्दयावरून नायब राज्यपाल अडून बसले होते. त्यांना समजावून सांगितल्यानंतर मान्य केले.

* चीन भारताच्या सीमेत आले आहे, केंद्राची भूमिका काय असावी, तुम्ही याकडे कसे पाहता?

>> आता संपूर्ण देशालाच वाटते की चीन आमच्या सीमेत आले आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचे भूक्षेत्र आम्हाला परत मिळायला पाहिजे. देशाच्या जमीनीवर अतिक्रमण करणे हा देशाचा आणि २० शहिदांचा अपमान आहे. संपूर्ण देश पंतप्रधान, केंद्र आणि आर्मीसोबत आहे. सर्वच पक्षांनी आम्ही केंद्र सरकार सोबत असल्याचे एकसुरात सांगितले. आता केंद्राने त्या दिशेने काम करावे.

* भारत- चीन संबंध सुधारू शकतात? 

>> हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मैत्री समसमान असेल. आम्ही अनेकदा अनुभवले, मग १९६२ असो की २०२०. भारताने मैत्रीचा हात पुढे केला. मात्र, त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. त्याचे कारणही आहे, आम्ही आज चीनवर निर्भर आहोत. त्यांची घुसघोरी आपण संधी म्हणून घ्यावी. चीनमधून लहानसहान वस्तु आयात केल्या जात होत्या. लक्ष्मी आणि गणेशमूर्ती चीनहून येतात.चीनहून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंची यादी केंद्र सरकारने तयार करावी. वस्तुनुरूप भारतात निर्मिती वाढवावी. उद्योजकांना यासाठी मदत करावी. चीनच्या वस्तूंची आयात थांबवावी. यामुळे जीडीपी वाढेल, रोजगार निर्मिती होईल आणि अर्थव्यवस्था सुधारेल.

* विषय राम मंदिराचा आहे आणि देशाला कोरोनासोबत लढायचे आहे...

>> कोरोनामुळे देशाची स्थिती अत्यंत वाईट होऊ शकते. प्रभु रामचंद्राचा आशीर्वाद आमच्यासोबत असल्याचे मी मानतो. त्यामुळेच आम्ही सर्व मिळून कोरोनासोबत लढत आहोत. आमच्या डॉक्टरांकडे रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक सर्व सुविधा देण्याची ही वेळ आहे. देशातल्या गरीबांचा जीव वाचविणे, जो घाबरलेला आहे त्यांच्या मनातील भीती घालवणे,  त्यांना मदत करणे, शिक्षण देणे, आरोग्य सेवा पुरविणे हीच भगवान रामाची खरी पूजा ठरू शकते.

Web Title: We learned a few things from Dharavi on corona Virus: Arvind kejariwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.