शाहरुखसाठी वानखेडे पुन्हा खुले !
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
- दोन वर्षे आधीच प्रवेश बंदी उठवली
शाहरुखसाठी वानखेडे पुन्हा खुले !
- दोन वर्षे आधीच प्रवेश बंदी उठवलीमुंबई : बॉलीवूड अभिनेता व आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान याला आता वानखेडे स्टेडियम पुन्हा खुले झाले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अखत्यारितील या स्टेडियमवर प्रवेश करण्यास शाहरुखला पाच वर्षांसाठी मनाई करण्यात आली होती. मात्र एमसीएने दोन वर्षे आधीच ही बंदी मागे घेतली आहे.वानखेडेवरील सुरक्षारक्षकासोबत वाद घातल्याप्रकरणी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील एमसीएच्या समितीने १८ मे २०१२ रोजी शाहरुखवर वानखेडे स्टेडियम व परिसरामध्ये प्रवेश करण्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. रविवारी झालेल्या एमसीएच्या बैठकीमध्ये ही बंदी उठविण्यात आली.या निर्णयाविषयी एमसीए उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले की, संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्वकल्पना दिल्यानंतर मी समितीसमोर शाहरुखवरील बंदी हटविण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यास सर्वांनी एकमताने होकार दिला. यामुळे आता शाहरुखला वानखेडे स्टेडियम तसेच परिसरात प्रवेश बंदी नसेल.शाहरुखने आतापर्यंत या बंदीविरोधात कोणतेही आक्षेपार्ह हालचाल केली नसून त्याने एमसीएच्या निर्णयाचे पालन केले आणि कधीही स्टेडियममध्ये किंवा परिसरात प्रवेश केला नाही. यामुळेच त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचे एमसीएने स्पष्ट केले. (क्रीडा प्रतिनिधी)..........................................नेमके काय झालेल?वानखेडे स्टेडियमवर १६ मे २०१२ रोजी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आणि त्याचा जल्लोष करण्यासाठी शाहरुख आपल्या मुलांसह मैदानात उतरला. यावेळी सुरक्षारक्षक विकास बाळकृष्ण दळवी यांनी मैदानात येण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे चवताळलेल्या शाहरुखने दळवी यांच्यासोबत वाद घालून अक्षरश: धिंगाणा घातला. यावेळी त्याने उपस्थित तेथील अधिकार्यांशी देखील गैरवर्तन केल्याने एमसीएने त्याच्यावर ही बंदी घातली होती....................................ज्यावेळी आवश्यकता होती त्यावेळी शाहरुख विरोधात कारवाई केली गेली. मात्र आता हा विषय आणखी वाढवण्याची आवश्यकता नसल्याचे आम्हाला वाटते.- आशिष शेलार, उपाध्यक्ष, एमसीए--------विशेष म्हणजे, याप्रकरणी एकदाही एमसीएची माफी न मागणार्या शाहरुखला एमसीएने दोन वर्षे आधीच माफ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शाहरुखने त्यावेळी हे आरोप अमान्य करताना स्वत:ला निर्दोष म्हटले होते.