Video: Navjot Singh Sidhu appeal to Muslims for vote to Congress | Video: मुस्लिमांनो एकगठ्ठा काँग्रेसला मतदान करा, नवजोत सिंग सिद्धूंचे वादग्रस्त विधान  
Video: मुस्लिमांनो एकगठ्ठा काँग्रेसला मतदान करा, नवजोत सिंग सिद्धूंचे वादग्रस्त विधान  

कटिहार - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. नेत्यांच्या भाषणबाजीकडे निवडणूक आयोगाचाही करडी नजर आहे. मायावती यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी केलेलं विधान कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकतो. मुस्लिम समुदायामध्ये फूट पाडण्यासाठी मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएमसारखी पार्टी अस्तित्त्वात आली आहे. मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे. 

कटिहार लोकसभा मतदारसंघातील बलरामपुर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेला नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपाला टीकेचं लक्ष्य केलं. या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याकांची लोकसंख्या जास्त असल्याने मुस्लिम मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले तारीक अन्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जर मुस्लिमांनी एकत्र येत एकगठ्ठा काँग्रेसला मतदान केलं तर तारीक अन्वर यांना कोणी हरवू शकत नाही असा दावा नवजोत सिंग सिद्धू यांनी केला आहे. 

या प्रचारसभेत बोलताना नवजोत सिंग सिद्धू म्हणाले की, याठिकाणी लोकांना जातीपातीत  भांडून राजकारण केलं जात आहे. या मतदारसंघात मुस्लिमांनी अल्पसंख्याक बनून राहू नका, बहुसंख्यांक बना. या मतदारसंघात अल्पसंख्याकांचे मतदान ६२ टक्के आहे. जर भाजपावाले तुमच्या मतांमध्ये फूट पाडत असतील तर तुम्ही सगळे एकजूट दाखवा, जर असं झालं तर काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही असं नवजोत सिंग यांनी सांगितले. 


त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर निशाना साधत नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधानांचा उल्लेख फेकू असा केला. याआधीही बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनीही मुस्लिमांबाबत असं विधान केलं होतं. ज्यामुळे मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ४८ तास प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली आहे. 

मायावती यांनी देवबंद येथे मुस्लिम समुदायाला एकत्र राहण्याचं आवाहन करत सपा-बसपाला मतदान करा असं वक्तव्य केलं होतं. आचारसंहितेच्या नियमांनुसार देशातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अथवा पक्षाने धर्म आणि जातीच्या नावावर मतदान करण्याचं आवाहन करु शकत नाही.


Web Title: Video: Navjot Singh Sidhu appeal to Muslims for vote to Congress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.