आणखी एक लहान भाऊ भाजपला ताकद दाखवण्याच्या तयारीत; थेट २०० जागा लढवण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 03:17 PM2021-06-27T15:17:13+5:302021-06-27T15:19:31+5:30

भाजपसोबत बिहारमध्ये सत्तेत असलेल्या जेडीयूची उत्तर प्रदेशात आव्हानाची भाषा

uttar pradesh assembly election will contest 200 seats says jdu leader kc tyagi | आणखी एक लहान भाऊ भाजपला ताकद दाखवण्याच्या तयारीत; थेट २०० जागा लढवण्याचा इशारा

आणखी एक लहान भाऊ भाजपला ताकद दाखवण्याच्या तयारीत; थेट २०० जागा लढवण्याचा इशारा

googlenewsNext

लखनऊ: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढील लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजली जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. उत्तर प्रदेशात भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे. मात्र बिहारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या संयुक्त जनता दलानं उत्तर प्रदेशात २०० जागांवर निवडणूक लढवण्याचा संकल्प केला आहे.

बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं सरकार आहे. जेडीयूचे नीतीश कुमार मुख्यमंत्री आहेत. मात्र उत्तर प्रदेशात जेडीयूनं भाजपला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. जेडीयू २०० जागांवर उमेदवार देईल, अशी माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी दिली. 'योगी सरकारबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहे. सर्वांना सारखा वाटा मिळायला आहे. प्रत्येकाला स्वत:चा अधिकार हवा आहे. उत्तर प्रदेशात भाजपसोबत जागावाटपाचा तिढा न सुटल्यास आम्ही लहान पक्षांसोबत जाऊ,' असं त्यागी म्हणाले.

'उत्तर प्रदेशात शेतकरी आणि मागास वर्गांना न्याय मिळत नाही. आम्ही २०० जागांवर उमेदवार देऊ. यातील बहुतांश उमेदवार शेतकरी आणि मागास वर्गीय असतील. याच वर्गांनी योगी आणि मोदींना सत्तेत आणलं आहे,' असं त्यागी यांनी म्हटलं. तुम्ही भाजपप्रणित एनडीएचा भाग आहात, याबद्दल विचारणा केली असता, आमचं प्राधान्य भाजपसोबत निवडणूक लढण्याला आहे. मात्र जागावाटपावरून बातचीत फिस्कटल्यास आम्ही कोणाहीसोबत जाऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करणार का, असा प्रश्न विचारला असता, नेताजींसोबत (मुलायम सिंह यादव) आमचे चांगले संबंध आहेत. मात्र आम्ही समाजवादी पक्षासोबत जाणार नाही. एमआयएमसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यागींनी सांगितलं.
 

Web Title: uttar pradesh assembly election will contest 200 seats says jdu leader kc tyagi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.