भारताच्या दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून डोनाल्ड ट्रम्प रवाना, जाणून घ्या 36 तासांचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 09:37 PM2020-02-23T21:37:51+5:302020-02-23T21:51:05+5:30

दोन दिवसांच्या दौऱ्यात ते 36 तासांचा वेळ भारतात व्यतीत करणार आहेत.

us president donald trump 36 hours schedule in india | भारताच्या दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून डोनाल्ड ट्रम्प रवाना, जाणून घ्या 36 तासांचा कार्यक्रम

भारताच्या दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून डोनाल्ड ट्रम्प रवाना, जाणून घ्या 36 तासांचा कार्यक्रम

Next
ठळक मुद्देभारतीय वेळेनुसार रविवारी रात्री सव्वा आठ वाजता ते वॉशिंग्टनहून निघाले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते 36 तासांचा वेळ भारतात व्यतीत करणार आहेत. त्याचा कार्यक्रम खूप व्यस्त राहणार आहे. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इवांका ट्रम्प, जावई आणि एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारतात दाखल होणार आहे.

नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री सव्वा आठ वाजता ते वॉशिंग्टनहून निघाले आहेत. ते अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष असतील, जे भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते 36 तासांचा वेळ भारतात व्यतीत करणार आहेत. त्याचा कार्यक्रम खूप व्यस्त राहणार आहे. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इवांका ट्रम्प, जावई आणि एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारतात दाखल होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार ते उद्या सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प दुपारी 12.15 वाजता साबरमती आश्रमात पोहोचतील. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी ते दुपारी 1.05 वाजता अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियममध्ये दाखल होणार आहेत. या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प जवळपास 1.10 लाख लोकांना संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम अमेरिकेच्या ह्युस्टनमधील 'हाऊडी मोदी'च्या धर्तीवर होणार आहे.

गुजरातहून दिल्लीला पोहोचण्यापूर्वी ट्रम्प आपल्या कुटुंबासमवेत ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जाणार आहेत. अहमदाबादहून दुपारी 3.30 वाजता ते विमानानं आग्र्यासाठी कूच करणार आहेत. संध्याकाळी 4.45 वाजता ते आग्रा येथे पोहोचतील. सायंकाळी सव्वा पाच वाजता ताजमहालला भेट देणार आहेत. ताजमहाल येथे पोहोचल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचे स्वागत करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प कुटुंबीय सुमारे 50 मिनिटे ताजमहाल पाहणार आहे. संध्याकाळी 6.45 वाजता ते दिल्लीसाठी रवाना होतील. तसेच संध्याकाळी साडेसात वाजता ते राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत.  

दिल्लीतील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत होणार
या दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात डोनाल्ड ट्रम्प यांचे औपचारिक स्वागत होणार आहे. यानंतर साडेदहा वाजता ट्रम्प राजघाट येथील महात्मा गांधींच्या समाधीस भेट देऊन त्यांना फुलं अर्पण करतील. सकाळी 11 वाजता ते हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह औपचारिक बैठक करतील. हैदराबाद हाऊसमध्येच दुपारी 12.40 वाजता सामंजस्य करारांची देवाणघेवाण होणार आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दोन्ही देशांमध्ये 5 सामंजस्य करार होणार असल्याची माहिती आधीच दिलेली आहे. हे सामंजस्य करार बौद्धिक संपत्ती, व्यापार सुलभता आणि देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी दुपारच्या जेवणाचे आयोजन करणार आहेत. संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासमवेत राष्ट्रपती भवनात पोहोचतील. त्या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती त्यांच्यासाठी रात्रीचे जेवण आयोजित करतील. या डिनरमध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. ट्रम्प रात्री दहा वाजता पुन्हा अमेरिकेला रवाना होतील.

Web Title: us president donald trump 36 hours schedule in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.