दोन्ही देश राजी असतील तरच काश्मीरवर अमेरिकेची मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 04:19 AM2019-07-24T04:19:21+5:302019-07-24T06:57:46+5:30

अमेरिकेची सारवासारव : मात्र पाकने दहशतवाद्यांवर कारवाई करावी

US mediation on Kashmir only if both countries agree | दोन्ही देश राजी असतील तरच काश्मीरवर अमेरिकेची मध्यस्थी

दोन्ही देश राजी असतील तरच काश्मीरवर अमेरिकेची मध्यस्थी

googlenewsNext

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्याने मोठी अडचण झाली हे पाहताच अमेरिकेने सारवासारव केली; पण ट्रम्प असे बोललेच नाहीत, असे काही सांगितले नाही. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता म्हणाला, काश्मीर हा द्विपक्षीय विषय असल्याने दोन्ही देश राजी असतील तरच अमेरिका त्यात पडेल; पण दोन्ही देशांनी हा वाद आपसात सोडवायचा झाला तरी पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निरंतर कारवाई करणे त्यासाठी गरजेचे आहे, असे अमेरिकेचे मत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पहिल्याच अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ केलेल्या छोटेखानी वक्तव्यात ट्रम्प यांनी हा दावा केला होता. काश्मीरप्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी, असे सुचवून आधी इम्रान खान यांनी या विषयाची सुरुवात केली. त्यावर ‘माझी मदत होणार असेल तर मध्यस्थ व्हायला मला आवडेल’, असे त्यावर ट्रम्प उत्तरले. मात्र, एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले, दोनच आठवड्यांपूर्वी माझी पंतप्रधान मोदींशी भेट झाली. तेव्हा या विषयावर आमचे बोलणे झाले. खरे तर ‘तुम्ही मध्यस्थी कराल का?’, असे मोदींनी मला विचारले. मी ‘कशात’ असे विचारल्यावर त्यांनी ‘काश्मीर’ असे सांगितले. 

इम्रान खान काय म्हणतात?

भारत व पाकिस्तान यांच्यातील काश्मीरसह सर्व वाद सोडविण्यात मदत करण्याची मी अमेरिकेला विनंती केली आहे व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्या बाबतीत मोठी भूमिका नक्कीच बजावू शकतात, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले. ट्रम्प यांच्याशी भेट व चर्चा झाल्यानंतर ‘फॉक्स न्यूज’शी बोलताना इम्रान खान म्हणाले, भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीर हाच वादाचा एकमेव विषय आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली या नात्याने या वादात फक्त अमेरिकाच मध्यस्थी करू शकते. काश्मीर या एकाच मुद्द्यावरून आमचे दोन्ही देश गेली ७०वर्षे शेजारी म्हणून सलोख्याने राहू शकलेलो नाही, असेही यावेळी इम्रान खान म्हणाले.

इम्रान खान पुढे म्हणाले की, भारताने चर्चेसाठी तयार व्हावे व त्यात अमेरिका व राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मोठी भूमिका बजाबू शकतात, असे मला मनापासून वाटते. हा १.३ अब्ज लोकांचा प्रश्न आहे. हा वाद खरोखरच शांततेने सुटू शकला तर त्याच्या फायद्यांची केवळ कल्पनाच केली जाऊ शकते. भारताने अण्वस्त्रांचा त्याग करण्याचे ठरविले तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल, असे विचारता ते म्हणाले, पाकिस्तानही लगेच तसे करायला तयार होईल.

भारत व पाकिस्तानपुढे अणुयुद्ध हा पर्याय असूच शकत नाही. तो आत्मविध्वंसाचा मार्ग आहे, असेही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य खरे असेल तर पंतप्रधानांनी भारताचे हित व सिमला कराराची प्रतारणा केली, असेच म्हणावे लागेल. परराष्ट्र मंत्रालयाच्या जुजबी इन्काराने भागणार नाही. ट्रम्प यांच्याशी नेमके काय बोलणे झाले, हे स्वत: मोदींनी देशापुढे स्पष्ट करावे. -राहुल गांधी, काँग्रेस नेते

Web Title: US mediation on Kashmir only if both countries agree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.