PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:44 IST2025-11-12T15:39:48+5:302025-11-12T15:44:32+5:30
PM Modi visited LNJP Hospital: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या दौऱ्यावरून परत येताच त्यांनी सर्वात प्रथम दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींची भेट घेतली.

PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या दौऱ्यावरून दिल्लीत परत येताच त्यांनी सर्वात प्रथम लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात गाठून बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या लोकांची विचारपूस केली आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, कटकारस्थान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी आधीच दिला असून यासंर्भात आज पंतप्रधान निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे.
एलएनजेपी रुग्णालयात सध्या दिल्ली बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक जखमी व्यक्तीशी संवाद साधला, त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, दिल्ली स्फोटानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. या संदर्भात, आज संध्याकाळी सुरक्षा व्यवस्थेवरील मंत्रिमंडळ समितीची बैठक होणार आहे, ज्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक आज संध्याकाळी ५:३० वाजता पंतप्रधान निवासस्थान ७ लोक कल्याण मार्ग येथे होणार आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटावर मोदींची प्रतिक्रिया
दिल्लीतील घटनेबाबत कळताच खूप दुःख झाले. मी संपूर्ण रात्र तपासात सहभागी असलेल्या एजन्सींसोबत बैठकांमध्ये घालवली. संपूर्ण देश पीडितांच्या कुटुंबांसोबत उभा आहे. मी त्यांचे दुःख समजतो. एजन्सी या कटाच्या तळाशी पोहोचतील. कटकारस्थान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही", असे मोदी म्हणाले.
नेमकी घटना काय?
सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा मोठा स्फोट झाला. या घटनेमुळे देशभरात घबराट निर्माण झाली असून, सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार, या स्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.