केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अडचणीत?; काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 06:18 AM2021-07-23T06:18:17+5:302021-07-23T06:19:13+5:30

म्हणे, ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही

union minister of state for health dr bharti pawar in trouble | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अडचणीत?; काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अडचणीत?; काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले. केंद्र सरकारच्या या विधानावरून देशभर विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले असून, आता काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरोधात राज्यसभेत विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटले की, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नाही, ही चुकीची माहिती देऊन राज्यसभेची दिशाभूल केली आहे. सभागृहात चुकीची माहिती दिल्याबद्दल आरोग्य राज्यमंत्र्यांना विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस दिली आहे. देशात ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक लोकांचा जीव गेला, हे सगळ्यांना माहिती आहे. तरीही मंत्री असे विधान करून सभागृहाची दिशाभूल करत आहेत. हा आमच्या अधिकारांचा भंग आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पुढील कार्यवाहीसाठी ही हक्कभंगाची नोटीस विशेषाधिकार समितीकडे पाठविण्यात यावी, अशी सभापतींना विनंती आहे, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोणत्याही राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नाही, असे म्हटले.

खुनाचा गुन्हा दाखल करा

- शिवसेनेचे सदस्य संजय राऊत यांनीही केंद्र सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर नेटिझन्सनेही सरकारला धारेवर धरले आहे. 

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, देशात ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यसभेत नेमके काय म्हणाल्या?

- राज्यसभेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड- १९ च्या मृत्यूबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

- सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नियमितपणे केंद्र सरकारकडे कोविड- १९ मुळे झालेल्या मृत्यूसंख्येची माहिती द्यावी. सध्या तरी देशात ऑक्सिजनअभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नाही.
 

Web Title: union minister of state for health dr bharti pawar in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.