Two years later,isro will launch Indians into space; Gaganyan will fly next year | दोन वर्षांनी इस्त्रो भारतीयांना अंतराळवारी घडवणार; गगनयान पुढील वर्षी झेपावणार
दोन वर्षांनी इस्त्रो भारतीयांना अंतराळवारी घडवणार; गगनयान पुढील वर्षी झेपावणार

बेंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) गगनयान प्रकल्पासाठी डिसेंबर 2020 मध्ये पहिली फ्लाईट सोडणार आहे. यानंतर जुलै 2021 मध्ये दुसरे मानवरहित फ्लाईट अंतराळात पाठविणार असल्याची घोषणा इस्त्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी सांगितले. तसेच डिसेंबर 2021 मध्ये तिसरी फ्लाईट पाठविणार असून यातून पहिल्यांदाच भारतीय अंतराळवारी करणार आहेत. 


गगनयान भारतासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. ही मोहीम देशाची विज्ञान आणि प्रौद्योगिक क्षमतेला वाढविणार आहे. सिवन यांनी चांद्रयान-2 ची माहिती देताना इस्त्रोचे पुढील उद्दीष्ट गगनयान असल्याचे स्पष्ट केले होते. 


यापूर्वी 6 सप्टेंबरला हवाईदलाने अंतराळातील पहिल्या मानव मोहिमेसाठी पायलटांच्या भरतीची पहिली प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. हवाईदलाने टेस्ट पायलटांसाठी फिजिकल एक्सरसाईज टेस्ट, लॅब इन्व्हेस्टिगेशन, रेडिओलॉजिकल टेस्ट, क्लिनिकल टेस्ट आणि सायकॉलॉजिकल स्तरावर मुल्यांकन करण्यात आले होते. 


डिसेंबर 2021 मध्ये गगनयान मोहिमेसाठी क्रू सिलेक्शन आणि ट्रेनिंग दिलेल्यांपैकी तीन वैमानिकांना पाठविण्यात येणार आहे. हे वैमानिक अंतराळात कमीतकमी सात दिवस राहणार आहेत. या यानाला जीएसएलव्ही मार्क-3 द्वारे अंतराळात पाठविले जाणार आहे. 


रशियात प्रशिक्षण 
या वैमानिकांना रशियामध्ये प्रशिक्षित केले जाणार आहे. गगनयान मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 मध्ये लालकिल्ल्यावरून केली होती. या मोहिमेसाठी 10 हजार कोटींचा खर्च येणार आहे. या खर्चालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

Web Title: Two years later,isro will launch Indians into space; Gaganyan will fly next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.