Tickets for the movie 'Chhapak' from the Congress and 'Tanaji' ticket from BJP are free in bhopal | काँग्रेसकडून 'छपाक' तर भाजपाकडून 'तानाजी' चित्रपटाची तिकीटं फ्री.. फ्री.. फ्री... 

काँग्रेसकडून 'छपाक' तर भाजपाकडून 'तानाजी' चित्रपटाची तिकीटं फ्री.. फ्री.. फ्री... 

भोपाळ - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणला, भाजपा नेते आणि समर्थकांकडून ट्रोल करण्यात आलंय. दीपिकाचा छपाक आज प्रदर्शित झाला आहे. तर, दुसरीकडे अजय देवगणचा तानाजी हाही चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची स्पर्धा लागली आहे. मात्र, दीपिकाने जेएनयुमध्ये घेतलेल्या भूमिकेवरुन दीपिकाच्या छपाकला काही संघटनांकडून विरोध होत आहे.  

जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिकाने सहभाग घेतला होता. यावरून तिचा आगामी चित्रपट छपाकवर बहिष्कार घालण्याची मोहीम ट्रोलर्सनी राबविली आहे. तर, सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. याचा परिणाम दीपिकाच्या चित्रपटावर जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे अजय देवगणच्या तानाजी चित्रपटाचे प्रमोशन केलं जात आहे. त्यामुळेच, या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनात राजकीय हस्तक्षेप होताना दिसत आहे. 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना छपाक चित्रपट दाखविण्यासाठी संपूर्ण थेअटरच बुक केलं आहे. तर, मध्य प्रदेशमध्ये युवक काँग्रेसकडून छपाक चित्रपटाची तिकिटे मोफत वाटण्यात येत आहे. दीपिकाचं समर्थन करण्यासाठी हा प्रमोशन फंडा सुरू आहे. दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांकडून अजय देवगणच्या तानाजी चित्रपटाची तिकीटे मोफत वाटण्यात येत आहेत. तानाजी चित्रपटापुढे दीपिकाच छपाक फ्लॉप व्हावा, या हेतुने भाजपा समर्थकांनी तानाजी चित्रपटाची तिकीटं मोफत वाटली आहेत. मात्र, राजकीय वादात या दोन्ही चित्रपटांना मोफत पाहण्याची संधी सर्वसामान्यांना होत आहे. त्यामुळे, प्रेक्षकांचं चांगलच भागलंय. 
दरम्यान, भारताचे तुकडे करू पाहणाऱ्यांसोबत, तरुणींच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करणाऱ्यांसोबत दीपिका उभी होती, याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. जेएनयूतील विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेएनयू कॅम्पसमध्ये गेलेल्या दीपिकावर इराणींनी एका कार्यक्रमात भाष्य केलं. या कार्यक्रमाचा व्हिडीओ भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गांनी ट्विट केला आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tickets for the movie 'Chhapak' from the Congress and 'Tanaji' ticket from BJP are free in bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.