कोरोनातून बरे झालेल्यांनी करावीत योगासने- आरोग्य मंत्रालय; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:21 AM2020-09-14T01:21:20+5:302020-09-14T06:01:26+5:30

कोरोनातून बरे झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात म्हटले आहे की, ज्या कोरोना रुग्णांनी घरातच विलगीकरणात राहून उपचार घेतले व बरे झाले त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

Those who have recovered from Corona should do yoga - Ministry of Health; New guidelines released | कोरोनातून बरे झालेल्यांनी करावीत योगासने- आरोग्य मंत्रालय; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

कोरोनातून बरे झालेल्यांनी करावीत योगासने- आरोग्य मंत्रालय; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Next

नवी दिल्ली : कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी च्यवनप्राशचे सेवन करावे तसेच योगासने, ध्यानधारणा करावी तसेच रोज गुळण्या व पायी चालण्याचा व्यायाम करावा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोनातून बरे झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात म्हटले आहे की, ज्या कोरोना रुग्णांनी घरातच विलगीकरणात राहून उपचार घेतले व बरे झाले त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोनातून बरे झालेल्या लोकांनीही यापुढे मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार धुणे या गोष्टी पाळाव्यात. गरम पाणी प्यावे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेली औषधी घेत जावीत. या औषधींची नावे व किती प्रमाणात घ्यावीत याचा तपशील आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आला आहे.
कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी पौष्टिक आहार घ्यावा. पचायला सोपे व ताजे अन्न खाण्यावर भर द्यावा. तसेच रोज पुरेशी झोप घ्यावी. धूम्रपान किंवा मद्यपान करणे टाळावे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त व्याधी असतील व तो कोरोनाच्या संसर्गातून बरा झालेला असेल तर अशाने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य ती औषधी घ्यावी.
रोज आपल्या शरीराचे तापमान, रक्तदाब, शरीरातील शर्करेचे प्रमाण, नाडीचे ठोके, शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण हे त्या व्यक्तीने स्वत: तपासून बघावे. जर कोरडा खोकला, घसा दुखणे अशी लक्षणे आढळली तर त्या व्यक्तीने वाफारा घ्यावा तसेच गुळण्या कराव्यात. कोरोनातून बरे झालेल्यांनी आपले अनुभव सोशल मीडिया, नातेवाईक, मित्र यांच्यामार्फत सर्वांना कळवावेत. त्यामुळे या आजाराविरोधात लढण्यास लोकांना मानसिक पाठबळ मिळेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

Web Title: Those who have recovered from Corona should do yoga - Ministry of Health; New guidelines released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.