रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 07:28 IST2025-12-09T07:28:14+5:302025-12-09T07:28:58+5:30
रविवारी मध्यरात्रीनंतर गोव्यातील एका नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, त्यात आसामच्या तीन तरुणांचा समावेश आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.

रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
गुवाहाटी : आमच्या गावात रोजगार नव्हता, म्हणून आमची लेकरं गोव्याला गेली, पण आता त्यांचा थेट मृतदेह येतोय... असा आक्रोश गोव्यातील भीषण आगीत प्राण गमावलेल्या आसाममधील तिन्ही तरुणांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. एका मृत तरुणाचा लहान भाऊ थरथरत म्हणाला, दादा म्हणायचा, थोडं कमवून परत येईन. पण आता विमानातून तो परत येईल, फक्त मृतदेह म्हणून...
रविवारी मध्यरात्रीनंतर गोव्यातील एका नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, त्यात आसामच्या तीन तरुणांचा समावेश आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
स्वप्नांसोबत जळाले ३ जीव
मनोजित मल (२४) आणि राहुल टांती (६०) हे दोघेही त्या नाइट क्लबच्या स्वयंपाकघरात रोजंदारीवर काम करत होते. दिगंत पतीर हा ढेमाजी जिल्ह्यातील तरुणही स्वयंपाकी म्हणून तिथे कामाला होता. ते काम संपवून विश्रांतीला बसले असतानाच रात्रीच्या काळोखात आग पेटली आणि क्षणातच सर्वकाही संपलं.
राज्यात रोजगार असता, तर मुलं बाहेर गेलीच नसती
राज्यात काही काम नाही, पोटासाठी पोरं बाहेर गेली... गोवा, केरळ, बंगळुरू असे मिळेत तेथे काम करतात. पण आता ते परत येणार नाहीत, हे सांगताना राहुल टांती आणि मनोजित मल यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू होते.
दोघेही ‘टी ट्रायब’ समुदायातील होते. बराक खोऱ्यातील चहाबागांची स्थिती इतकी दयनीय आहे की तरुणांनी शेती सोडून परराज्यात काम शोधण्याचा मार्ग धरला आहे.
दिगंत पतीरची आई थरथरत्या आवाजात म्हणाली, ढेमाजी जिल्ह्यात काहीच नाही...दोन्ही मुलं दूर राज्यांत गेली. एक कायमचा गेला...