'There is no pardon in the country', Priyanka Gandhi said to Modi about Duryodhana in election rally | 'या देशात अहंकाराला माफी नाही', प्रियंका गांधींकडून मोदींना दुर्योधनाची उपमा
'या देशात अहंकाराला माफी नाही', प्रियंका गांधींकडून मोदींना दुर्योधनाची उपमा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत टीका केली होती. या टीकेचा काँग्रेसकडून समाचार घेतला जात आहे. देशपातळीवरील काँग्रेस नेते मोदींच्या टीकेला उत्तर देत आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदींना अहंकारी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांच्या कवितेच्या माध्यमातून प्रियंका यांनी मोदींवर टीका केली. 

हरयाणातील अंबाला येथे प्रियंका गांधी यांच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी, सभेत बोलताना प्रियंका गांधींनी मोदींवर पलटवार केला. प्रियंका यांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली. तसेच, कवी दिनकर यांच्या कवितेतील ओळींमधून मोदींना लक्ष्य केले. निवडणूक प्रचारात भाजपा नेते विकासकामाबद्दल काहीही बोलत नाहीत. आपण दिलेला वचननामा पूर्ण केला, याबाबतही शब्द काढत नाही. केवळ, शहीद जवानांच्या नावाने मत मागतात. तर कधी माझ्या कुटुंबातील शहीद सदस्यांचा अपमान करतात. मोदींनी माझ्या शहीद वडिलांचा अपमान केला आहे. यंदाची निवडणूक कुठल्याही एका कुटुंबासाठी नसून तो देशातील सर्वच कुटुंबासाठी आहे, ज्यांची स्वप्ने आणि आशा या पंतप्रधानांनी मोडून काढल्या आहेत. 

या देशाने कधीही अहंकार आणि गर्व करणाऱ्यांना कधीच माफ केले नाही. इतिहास, महाभारत याची साक्ष देतो. महाभारताचेच उदाहरण देत प्रियंका यांनी मोदींनी तुलना दुर्योधनाशी केली. दुर्योधनासही असाच अहंकार झाला होता, श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाला सत्य समजाविण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना बंदी बनविण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला. त्यावरच, राष्ट्रकवी रामधारीसिंह दीनकर यांच्या कवितेतील ओळी प्रयंका यांनी म्हणून दाखवल्या.

जब नाश मनुष्यपर छाँता है, पहले विवेक मर जाता है
हरीने भीषण हुँकार किया, अपना स्वरुन विस्तार किया
डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, 
रणधीर बडाकर सांज मुझे, हाँ.. हाँ.. दुर्योधन बांध मुझे


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका करताना, राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन असल्याचे म्हटले होते. आपल्या निवडणूक प्रचारातील एका भाषणात मोदींनी दिवंगत राजीव गांधींनाही लक्ष्य केले होते.
 


Web Title: 'There is no pardon in the country', Priyanka Gandhi said to Modi about Duryodhana in election rally
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.