Tharoor is charged with murder case by court | थरुर यांच्यावर खुनाचा खटला चालवा
थरुर यांच्यावर खुनाचा खटला चालवा

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार डॉ. शशी थरूर यांच्याविरुद्ध त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भात खुनाचा आरोप ठेवून खटला चालविला जावा, असा आग्रह दिल्ली पोलिसांतर्फे शनिवारी न्यायालयत धरण्यात आला. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी संशयास्पद स्थितीत मृत आढळल्या होत्या. त्यासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यात त्यांचे पती शशी थरुर हे एकमेव आरोपी आहेत.

या खटल्यासाठी आरोपनिश्चितीच्या संदर्भात गुरुवारी विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्यापुढे पोलिसांतर्फे पब्लिक प्रॉसिक्युटर अतुल श्रीवास्तव यांचा युक्तिवाद झाला. तपासातून उघड झालेल्या माहितीच्या आधारे श्रीवास्तव यांनी असे आग्रही प्रतिपादन केले की, थरुर यांच्याविरुद्ध भादवि कलम ४९८ ए (विवाहितेचा छळ करणे) व कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे ) या कलमान्वये किंवा पर्याय म्हणून कलम ३०२ (खून) या अन्वये आरोप निश्चित करून खटला चालविला जावा. श्रीवास्तव म्हणाल्या की, मृत्यूच्या आधीपर्यंत सुनंदा पुष्कर यांची प्रकृती ठणठणीत होती व त्यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा डॉक्टरांचा निष्कर्ष आहे. हे विष त्यांना केवळ तोंडावाटेच नव्हे तर इंजेक्शननेही दिले गेले असण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. मृतदेहावर दाताने चावल्याच्या व्रणाखेरीज अन्य जखमाही आढळल्या. यावरून मृत्यूपूर्वी त्यांची शारीरिक झटापट झाली असावी.

शारीरिक, मानसिक छळ केल्याचा दावा
थरुर दाम्पत्याच्या घरातील नोकर व पुष्कर यांच्या मित्रांच्या जबानीवरून असे स्पष्ट होते की, त्यांचे वैवैहिक संबंध कमालीचे बिघडलेले होते.

एवढेच नव्हे तर ‘आता जगण्याचीही इच्छा राहिलेली नाही’, असे पुष्कर यांनी काहींना सांगितले होते. यावरून थरूर यांनी त्यांचा केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकही छळ केल्याचे दिसते, असेही प्रॉसिक्युटरचे म्हणणे होते.

Web Title: Tharoor is charged with murder case by court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.