तामिळनाडूत स्टॅलिन यांच्यासह ३४ मंत्र्यांचा शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:26 AM2021-05-08T05:26:11+5:302021-05-08T05:27:19+5:30

पुदुच्चेरीत एन. रंगासामी यांनी घेतली शपथ 

In Tamil Nadu, 34 ministers, including Stalin, were sworn in | तामिळनाडूत स्टॅलिन यांच्यासह ३४ मंत्र्यांचा शपथविधी

तामिळनाडूत स्टॅलिन यांच्यासह ३४ मंत्र्यांचा शपथविधी

Next

चेन्नई : विधानसभा निवडणुकीत द्रमुकला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर पक्षाध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी तामिळनाडूचेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी ६८ वर्षीय स्टॅलिन यांना राजभवनात आयोजित साध्या समारंभात पद व गोपनीयतेची शपथ दिली. 
स्टॅलिन यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत एकूण ३४ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात १५ जण प्रथमच मंत्री झाले आहेत. या सर्व मंत्र्यांनी तामिळमधून शपथ घेतली. द्रमुकचे दिग्गज नेते आणि महासचिव दुराईमुरुगन यांना स्टॅलिन यांच्यानंतर शपथ देण्यात आली. त्यांच्याकडे जल संसाधन हे खाते देण्यात आले आहे. 

गृहखात्यासह सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन आदी खाती स्टॅलिन यांच्याकडे असणार आहेत. पलानीवेल त्यागराजन यांच्याकडे वित्त व मानव संसाधन ही खाती असणार आहेत. सुब्रमण्यन यांच्याकडे आरोग्य खाते दिले आहे. कृषी व पर्यावरणासह अनेक विभागांची नावे बदलण्यात आली आहेत. कृषी विभाग आता कृषक कल्याण विभाग, तर पर्यावरणऐवजी पर्यावरण व जलवायू परिवर्तन विभाग असेल. एमआरके पनीरसेल्वम कृषी व कृषक कल्याण मंत्री असतील. एस. मस्तान हे अल्पसंख्यांक मंत्री असतील. या कार्यक्रमास स्टॅलिन यांच्या पत्नी दुर्गा आणि आमदार व त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांची उपस्थिती होती.  विरोधी पक्ष अण्णाद्रमुकचे नेते ओ पनीरसेल्वम, काँग्रेसचे पी. चिदंबरम यांच्यासह एमडीएमकेचे अध्यक्ष वायको आणि राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

पुदुच्चेरीत एन. रंगासामी यांनी घेतली शपथ 
पुदुच्चेरी : एआयएनआरसीचे नेते एन. रंगासामी यांनी शुक्रवारी राज निवास येथे एका साध्या समारंभात पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन यांनी रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. या कार्यक्रमात केवळ रंगासामी यांनी तमिळ भाषेत शपथ घेतली. 

Web Title: In Tamil Nadu, 34 ministers, including Stalin, were sworn in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.