"विदेशी वस्तूंवर बहिष्कार म्हणजे स्वदेशी मोहीम नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 02:40 AM2020-08-14T02:40:42+5:302020-08-14T02:41:10+5:30

नव्या धोरणाची गरज : सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे प्रतिपादन

Swadeshi doesnt necessarily mean boycotting all foreign products says mohan Bhagwat | "विदेशी वस्तूंवर बहिष्कार म्हणजे स्वदेशी मोहीम नाही"

"विदेशी वस्तूंवर बहिष्कार म्हणजे स्वदेशी मोहीम नाही"

Next

नवी दिल्ली : सर्वच विदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला असा स्वदेशी मोहिमेचा अर्थ कोणीही काढू नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक धोरणे आखण्यात आली नाहीत. कोरोना संकटकाळामुळे विकासासाठी नवीन प्रकारचे धोरण आता राबविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

प्राध्यापक राजेंद्र गुप्ता यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात भागवत म्हणाले की भारतीयांमध्ये असलेल्या कर्तृत्वाला, कल्पकतेला वाव मिळेल अशी आर्थिक धोरणे स्वातंत्र्यानंतर कधीही राबविलीच गेली नाहीत; पण पूर्वी झाले नाही त्याची सुरुवात आता झाली आहे.

ते म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन नेतृत्वाने रशियाच्या पंचवार्षिक योजनेचे अनुकरण करून तशी योजना भारतात राबविली. मात्र, हे करताना भारतीयांचे ज्ञान व क्षमता याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रात कार्यानुभावावर जोर देण्याची गरज आहे.

विदेशातून आपल्याकडे कोणत्या गोष्टींची आयात होते यावर देशाची आत्मनिर्भरता ठरवता कामा नये. विदेशात जे जे उत्तम आहे, त्याचा स्वीकार करायचाच आहे; पण तो भारताने स्वत:च्या अटी घालून केला पाहिजे. स्वदेशीचा अर्थ सर्व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालावा, असा होत नाही.

विकासाच्या तिसऱ्या प्रारुपाची गरज
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले की, सध्या प्रचलित असलेल्या विकासाच्या दोन प्रारुपांनी मनुष्याला फारसे सुख लाभलेले नाही.
कोरोनाच्या संकटकाळात तर ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळेच विकासाचे तिसरे प्रारूप पुढे आणण्याची गरज आहे. ते मूल्याधारित असेल.
भारताला आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचा नवा आराखडा डोळ्यासमोर ठेवून म्हणत आहेत, असेही भागवत म्हणाले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, जगातील ज्ञानासंदर्भातील सर्व विचारांचा भारताने स्वीकार केला पाहिजे. आपल्या नागरिकांवर, त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून वाटचाल करणारा समाज या देशात निर्माण झाला पाहिजे.
ऐहिकवाद, जडवादाच्या तार्किक परिणतीतून व्यक्तिवाद व ग्राहकवादाचा जन्म झाला. साºया जगाला एक वैश्विक बाजारपेठ बनविण्याचा विचार प्रबळ होऊ लागला. त्यादृष्टीने विकासाची व्याख्या करण्यात आली.
त्यामुळे विकासाची दोन प्रारुपे सर्वांसमोर आली. एका प्रारुपात म्हटले आहे की, मनुष्याची सत्ता साºया जगावर आहे. तर दुसरे प्रारूप म्हणते की, साºया जगात समाजाचीच सत्ता आहे.

Web Title: Swadeshi doesnt necessarily mean boycotting all foreign products says mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.