Supriya Sule on Nilesh Rane: महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकून पकडलेल्या लाखो रुपयांच्या रोकडचा मुद्दा आज लोकसभेत चांगलाच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवत, थेट पंतप्रधानांनाच महाराष्ट्रातील स्थितीबद्दल प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी निलेश राणे यांच्या कृतीचे जाहीर कौतुक करत, ते देशभक्तीचं उदाहरण आहेत असं म्हटलं.
लोकसभेत निवडणूक सुधारणांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील अलीकडील नगर परिषद आणि पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या गोंधळाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. "महाराष्ट्रात निवडणुकीच्या फॉर्ममध्ये गडबड, अर्ज मागे घेण्यामध्ये आणि आरक्षणातही गडबड झाली. यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की, सत्ताधारी युती पक्षाचे आमदार निलेश राणे थेट भाजप नेत्याच्या घरात गेले आणि त्यांनी लाखोंची रोकड पकडली," असं म्हटलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी बाकांवर बसलेल्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावांचा उल्लेख करत, "हे याच सरकारचे भाग आहेत आणि यांच्याच लोकांनी हे उघडकीस आणले आहे," असे स्पष्ट केले.
'नोटबंदी'चा उद्देश काय? पंतप्रधानांना थेट प्रश्न
"पंतप्रधानांची इच्छा या देशातून काळा पैसा बाहेर काढण्याची होती. नोटाबंदी करून संपूर्ण देशाला कॅशलेस बनवायचे होते. असं असताना भाजपच्या नेत्याकडे सुटकेसभरून एवढी रोकड कशी मिळाली? हे पैसे सरकार छापत नाही, मग एवढी कॅश महाराष्ट्रात आली कुठून? या खोट्या नोटा आहेत की नेपाळमधून आलेल्या नोटा आहेत? हे एक मोठे रॅकेट असणार," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. या गंभीर प्रकरणाची तातडीने ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी लोकसभेत केली.
निलेश राणेंचं कौतुक
सुप्रिया सुळे यांनी यावेळी विरोधी पक्षाचे आमदार असतानाही निलेश राणे यांच्या कृतीचे जाहीर स्वागत केले. "मी आज ऑन रेकॉर्ड सांगते, भले ते शिवसेनेत असोत, पण निलेश राणेंनी जे केलं त्याचं मी स्वागत करते. देशभक्तीचं जर उदाहरण असेल, तर ते निलेशजी आहेत. ते सत्ताधारी पक्षात असूनही देशासाठी त्यांनी रोख रक्कम पकडून दिली. एवढंच नव्हे तर त्यांनी कॅमेऱ्यासमोर हे सगळं जगाला दाखवून दिलं की बघा भाजप काय करतंय," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी कॅमेऱ्यासह धाड टाकल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याच व्हिडिओचा आधार घेत सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत भाजपवर टीकेची झोड उठवली.
भाजपने काँग्रेसपेक्षा जास्त केलं
“भाजपा एवढं सांगतं की काँग्रेसनं अमुक सरकार पाडलं वगैरे. पण तुम्ही त्यापेक्षा जास्त केलं. हे लोकशाहीला धरून कसं आहे? जर तुम्हाला पक्ष तोडायचाय, हरकत नाही, नवा पक्ष काढा. मला तर पक्षाचं चिन्हही मिळालं नसतं. आम्हाला कोर्टात जावं लागलं. जर मी कोर्टात गेले नसते, तर आज लोकसभा निवडणूक जिंकून इथे खासदार होऊन आलेही नसते”, असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं.