south superstar kamal haasan gets covid 19 vaccine tweeting immunization against the corrupt | "पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराचं लसीकरण करुया"; कोरोनाची लस घेताना कमल हासन यांचा सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला

"पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराचं लसीकरण करुया"; कोरोनाची लस घेताना कमल हासन यांचा सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीवर पोहाचली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. देशात लसीकरणाला सुरुवात झाली असून अनेकांनी लस घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देखील कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली आहे. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधानांनी ट्विट करून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करू असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. याच दरम्यान प्रसिद्ध अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे. तसेच इतरांना देखील लस घेण्याचं आवाहन केलं आहे. 

कमल हासन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. "पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराचं लसीकरण करुया" असं म्हणत कोरोनाची लस घेताना कमल हासन यांनी सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला लगावला आहे. "श्री रामचंद्र या रुग्णालयात मी कोरोना व्हायरसला रोखणारी लस घेतली. जे लोक स्वत:ची नाही पण इतरांची पर्वा करतात त्यांनी ही लस घेणं गरजेचं आहे. सर्वांनी कोरोनापासून स्वत:च्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी COVID 19 ची ही लस घ्यावी. आता कोरोनाला रोखणारी लस घेऊया अन् पुढच्या महिन्यात भ्रष्टाचार रोखणारी लस देऊया" असं कमल हासन यांनी म्हटलं आहे. 

तामिळनाडूमध्ये होणाऱ्या निवडणुकीमुळे सोशल मीडियावर कमल हासन यांच्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.  कमल हासन यांनी यासोबत लस घेतानाचा एक फोटोही शेअर केला आहे आणि लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहेत. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतलीमोदींनी लस घेतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. 

फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण

पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. मोदींना लस टोचणाऱ्या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या नर्स केरळच्या होत्या. आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर काहींनी याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे मोदींनी घेतलेली कोरोना लस आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले असून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे. मास्क लावण्य़ाची आठवण करून देण्यासाठी काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा फोटो शेअर केला आहे. बायडन यांनी लस घेताना मास्क लावलेला फोटोही पोस्ट करत टोला लगावला आहे. 

...अन् भाजपा मंत्र्याने घरीच घेतली कोरोना लस; यात काय चुकीचं आहे? म्हणत केला अजब खुलासा 

कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील (BC Patil) यांनी देखील कोरोनावरील लस घेतली. पण पाटील यांनी सरकारी केंद्रात न जाता घरीच लस घेतल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील यांनी घरी कोरोना लस घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. घरी लस का घेतली याबाबत पाटील यांनी अजब खुलासा केला आहे. कोरोनावरील लस असुरक्षित आहे, ही नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी आपण रुग्णालयामध्ये जाण्याऐवजी घरीच लस घेतली असं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली असती तर आपल्यामुळे इतर नागरिकांना ताटकळत राहावं लागलं असतं. मात्र इथे मी नागरिकांनाही भेटू शकतो आणि लसही घेऊ शकतो. यात चुकीचं काय आहे? असं पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: south superstar kamal haasan gets covid 19 vaccine tweeting immunization against the corrupt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.