...त्यामुळे नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींना 10 दिवस राहावे लागले होते तिहार तुरुंगात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 09:48 AM2019-10-15T09:48:06+5:302019-10-15T09:49:48+5:30

यावर्षीच्या अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना एकेकाळी दहा दिवस तिहार तुरुंगात राहावे लागले होते.

... so Nobel winner Abhijit Banerjee had to stay in Tihar jail for 10 days | ...त्यामुळे नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींना 10 दिवस राहावे लागले होते तिहार तुरुंगात 

...त्यामुळे नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींना 10 दिवस राहावे लागले होते तिहार तुरुंगात 

Next

नवी दिल्ली - भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेल्या अभिजित बॅनर्जी यांना यावर्षीच्या अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बॅनर्जींना मिळालेल्या नोबेल पुरस्कारामुळे दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएन) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अभिजित बॅनर्जी हे जेएनयूचे विद्यार्थी होते. दरम्यान, जेएनयूमध्ये असताना अभिजित बॅनर्जीं यांना काही कारणामुळे 10 दिवस तिहार तुरुंगात राहावे लागले होते.
 
त्याचे झाले असे की, जेएनयूचे तत्कालीन अध्यक्ष एन.आर. मोहंती यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. मोहंती यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात अभिजित बॅनर्जी यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांवर अटकेची कारवाई करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. 

जेएनयू विद्यापीठ हे डाव्या विचारांच्या संघटनांचा बालेकिल्ला मानले जाते. पण 1982-83 च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत येथे मोठी उलथापालथ झाली होती. त्यावेळी येथे पाळेमुळे रोवलेल्या एआयएसए या डाव्या विद्यार्थी संघटनेचा पराभव झाला होता. मात्र या पराभवामुळे जेएनयूमधील प्रशासनही फारसे खूश नव्हते. त्यावेळी लेखक एन.आर. मोहंती यांनी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद पटकावले होते. मोहंती यांना अभिजित बॅनर्जी यांनी सक्रिय समर्थन दिले होते. त्यानंतर जेएनयूमध्ये अशा काही घटना घडल्या ज्यामुळे अभिजित बॅनर्जी यांना तुरुंगात जावे लागले. त्याकाळी जेएनयूमध्ये योगेंद्र यादव, सिंधू झा, सुनील गुप्ता, एस.एन. मलाकर हे विद्यार्थी राजकारणात सक्रिय होते. 

त्यावेळच्या घटनेबाबत एन. आर. मोहंती सांगतात की, ''जेएनयू प्रशासनाने एका विद्यार्थ्यांला हॉस्टेलमधून बाहेर काढले होते. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी याबाबत कुलगुरूंची भेट घेतली. त्यावेळी गैरवर्तनामुळे संबंधित विद्यार्थ्याला काढून टाकण्यात आल्याचे सांगितले. मात्र संपूर्ण चौकशीनंतरच कारवाई व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. हॉस्टेलमधून काढण्यात आलेल्या विद्यार्थ्याने एका शिक्षकाविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर इतर विद्यार्थीही संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी करू लागले होते. मात्र आमच्या विद्यार्थी संघटनेबाबत प्रशासन समाधानी नसल्याने ते चौकशीसाठी तयार झाले नाहीत. आम्हीही आमच्या मगाणीवर ठाम राहिलो. दरम्यान, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल रूमला टाळे ठोकले. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले.''

  ''हॉस्टेल रूमला टाळे ठोकण्यात आल्यानंतर आम्ही विरोध सुरू केला. तसेच टाळे तोडून त्या विद्यार्थ्याला त्याच्या रूममध्ये नेले. त्यामुळे गोंधळ माजला. विद्यापीठ प्रशासनाने माझ्यासह, युनियन सेक्रेटरी आणि त्या विद्यार्थ्यावर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी संपूर्ण जेएनयू आणि कुलगुरूंना घेराव घातला. पुढे पोलिसांनी हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांवर अटकेची कारवाई केली. सुमारे 700 विद्यार्थ्यांना अटक केली गेली. अभिजित बॅनर्जी हेसुध्या सुरुवातीपासून आम्हाला पाठिंबा देत होते. त्यामुळे त्यांनाही माझ्यासोबत तिहार तुरुंगात राहावे लागले.'' अशी माहिती एन.आर  मोहंती यांनी दिली. मात्र अभिजित बॅनर्जी यांनी आपल्याला पाठिंबा दिला असला तरी ते कुठल्याही विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले नव्हते, असेही मोहंती यांनी सांगितले.  

 अमेरिकेचे नागरिक असलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ प्रा. अभिजित विनायक बॅनर्जी, त्यांच्या फ्रेंच पत्नी एश्थर ड्युफ्लो आणि अमेरिकेचे प्रा. मायकेल क्रेमर या तिघांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. अर्थशास्त्रातील सैद्धांतिक संशोधनाबद्दल हा सर्वोच्च बहुमान मिळविणारे प्रा. बॅनर्जी हे डॉ. अमर्त्य सेन यांच्यानंतरचे भारतीय वंशाचे दुसरे अर्थतज्ज्ञ आहेत.  ५८ वर्षांचे प्रा. बॅनर्जी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट््स इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, तर त्यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या डॉ. ड्युफ्लो त्याच संस्थेत दारिद्र्य निर्मूलन व विकास अर्थशास्त्र या विषयाच्या प्राध्यापक आहेत. 

Web Title: ... so Nobel winner Abhijit Banerjee had to stay in Tihar jail for 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.