धक्कादायक! ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 10:42 AM2020-12-29T10:42:34+5:302020-12-29T10:46:18+5:30

ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ३३ हजार प्रवासी ब्रिटनहून भारतात दाखल झाले आहेत.

Six people returning to India from Britain tested positive for new type of corona | धक्कादायक! ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण

धक्कादायक! ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकावब्रिटनहून आलेल्या ६ जणांना नव्या कोरोनाची लागणदेशभरातील सुमारे १० प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांची तपासणी

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. 

एकीकडे नव्या वर्षाच्या स्वागताची सर्वत्र उत्सुकता लागलेली असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात झालेला शिरकाव चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. केंद्र सरकारने आज (मंगळवारी) दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेल्या ६ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाली आहे. यामध्ये तीन नमुने बेंगळुरू, दोन नमुने हैदराबाद आणि एक नमुना पुण्यातील प्रयोगशाळेतील असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले.  

देशभरातील प्रयोगशाळांमध्ये तपासणी सुरू

दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून सुमारे ३३ हजार प्रवासी भारतात आले असून, सर्वांची तपासणी करण्यात आली. यातील ११४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर देशभरातील सुमारे १० प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले असून, यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांचा समावेश आहे. 

कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या सर्व ६ जणांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच या ६ जणांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य सहप्रवाशांचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, कोरोनाच्या नवीन प्रकाराचा फैलाव ७० टक्के जलदरित्या होतो. आतापर्यंत जगभरातील १६ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे. नव्या प्रकारच्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहेत. 

Web Title: Six people returning to India from Britain tested positive for new type of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.