... आणि निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 08:22 AM2021-05-03T08:22:38+5:302021-05-03T08:25:04+5:30

बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला, कोरोना जिंकला; शिवसेनेची टीका

shiv sena saamna editorial slams bjp modi shah over west bengal election 2021 mamata banerjee | ... आणि निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

... आणि निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Next
ठळक मुद्देबंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला, कोरोना जिंकला; शिवसेनेची टीकापश्चिम बंगाल निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला मिळालं मोठं यश

विधानसभा निवडणुकांचे नुकतेच निकाल पार पडले. देशात पाच ठिकाणी निवडणुका असल्या तरी सर्वांचं लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागून होतं. या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे निवडणुकांत भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी त्यांना विजय मिळवता आला नाही. यावरून आता शिवसेनेनं भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. . प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि कोरोना जिंकला, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर टीका केली. 

फक्त प. बंगाल जिंकायचेच, या एका ईर्षेने व द्वेषाने ‘मोदी-शहां’चा भाजप मैदानात उतरला. त्यांनी लाखोंच्या सभा, रोड शो करून कोरोनाबाबतचे सर्व नियम पायदळी तुडवले व निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले, पण वेळ हातची गेली आहे. इतके करूनही प. बंगालच्या जनतेने भाजपला साफ नाकारले आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?

प. बंगालात ममतांचा पराभव करण्यासाठी भाजपने काय करायचे बाकी ठेवले? ‘जय श्रीराम’चे नारे देण्यापासून ते ममतांना ‘बेगम ममता’ असे डिवचण्यापर्यंत हिंदू-मुसलमान मतांचे ध्रृवीकरण करण्याचा चोख हातखंडा प्रयोगही सफल झाला नाही. जेथे हिंदूंचे मताधिक्य आहे त्या मतदारसंघांतही ममता बॅनर्जी यांनी विजय मिळविला. या काळात पंतप्रधान मोदी हे बांगलादेशातही सैर करून आले. बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबूर रेहमान यांना गांधी शांतता पुरस्कार जाहीर करून तो त्यांच्या कन्या बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांना प्रदान करून आले. त्यामुळे प. बंगालातील मुसलमान मते मिळतील असा कयास असावा, पण तसे घडले नाही.

ममता बॅनर्जी यांचा पक्षही उभा-आडवा फोडला, पण तरीही विषम लढाईत तृणमूल काँग्रेसने मोदी-शहांच्या राजकारणास धूळ चारली. हे ऐतिहासिक व सगळय़ांसाठी प्रेरणादायी आहे. प. बंगालातील लढाईत डावे व काँग्रेस कुठे औषधालाही उरले नाहीत. डाव्यांची जागा भाजपने घेतली. मतांची बेरीज वाढली तरी त्या प्रमाणात जागा जिंकता आल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाने अनेक मोहरे उभे केले. केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियोपासून पत्रकार स्वपन दासगुप्तांपर्यंत. ते सगळे आडवे झाले. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. दोनशेवर जागा जिंकून ममता यांनी ते सिद्ध केले. 

प. बंगालातील ममतांचा विजय हा मोदी-शहा-नड्डांचा दारुण पराभव आहे व या पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवायला हवे. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालांमुळे देशात असे घडेल आणि तसे घडेल अशा पैजा लागल्या, पण नवे काय घडले? आसाम सोडले तर भारतीय जनता पक्षाने सर्वत्र मातीच खाल्ली आहे. केरळात डाव्यांनी पुन्हा सत्ता राखली. तेथे सामना काँग्रेसशी झाला. तामीळनाडूत ‘द्रमुक’ने सत्ता मिळवली. पुद्दूचेरी ही ३० आमदारांची विधानसभा. तेथे भाजपने विजय मिळवला. आसामात काँग्रेसने चांगली लढत देऊनही भाजपने पुन्हा विजय मिळविला. मग भाजपच्या हाती नव्याने काय लागले? मोदी-शहांचा करिश्मा की काय, तो दक्षिणेत म्हणजे केरळ-तामीळनाडूत चाललाच नाही व प. बंगालात धाप लागेपर्यंत प्रचार करूनही यश मिळाले नाही.
 

Web Title: shiv sena saamna editorial slams bjp modi shah over west bengal election 2021 mamata banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.