... अन्यथा ओवेसींकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणून पाहिले जाईल : शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 06:51 AM2021-09-27T06:51:11+5:302021-09-27T06:51:46+5:30

शिवसेनेची ओवेसी यांच्यावर जोरदार टीका.

shiv sena saamna editorial criticize asaduddin owaisi bjp over election rallies uttar pradesh | ... अन्यथा ओवेसींकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणून पाहिले जाईल : शिवसेना

... अन्यथा ओवेसींकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणून पाहिले जाईल : शिवसेना

Next
ठळक मुद्देशिवसेनेची ओवेसी यांच्यावर जोरदार टीका.

"मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल," असं म्हणत शिवसेनेनं एमआयएनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला.

"ओवेसी हे राष्ट्रभक्तच आहेत. बॅ. जिना यांच्याप्रमाणे ते उच्चशिक्षित, कायदेपंडित आहेत, पण त्याच जिना यांनी राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा दिला. देशाची फाळणी हा कट होता व त्यामागे ब्रिटिशांची फोडा-झोडा व राज्य करा हीच नीती होती. आज ओवेसींच्या सभांमधून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे उठत आहेत. त्यामागेही राजकीय सूत्र आहेच.  ओवेसी यांनाही त्याच विजयाचे सूत्रधार म्हणून वापरले जात आहे. पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपचे राजकारण पुढे सरकणार नाही का?," असं शिवेसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून ओवेसी आणि भाजप यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावे लागेल, घडवले जाईल ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवेसी व त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निमित्ताने जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याची पूर्ण तयारी ओवेसी महाशयांनी केलेली दिसते. दोन दिवसांपूर्वी ओवेसी हे प्रयागराजवरून लखनौला जात असताना वाटेत त्यांचे समर्थक जमले व त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावले. इतके दिवस उत्तर प्रदेशात अशा प्रकारचे नारे लागल्याची नोंद नाही, पण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने ओवेसी येतात काय, ठिकठिकाणी भडकावू भाषणे करतात काय, त्यांच्या बेबंद समर्थकांची डोकी भडकवतात काय आणि मग ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची नारेबाजी सुरू होते काय, हा सर्व प्रकार पटकथालेखन ठरवल्याप्रमाणे सुरू असल्याच्या संशयास बळकटी येत आहे. 

ओवेसी हे पश्चिम बंगालातही याच पद्धतीचे घाणेरडे राजकारण करीत होते. ममता बॅनर्जी यांचा पराभव व्हावा यासाठी मुसलमानांना भडकविण्यासाठी त्यांनी शर्थ केली, पण प. बंगालात हिंदू आणि मुसलमान अशा सगळय़ांनी ममता बॅनर्जी यांना भरभरून मते टाकली व ओवेसींच्या गलिच्छ राजकारणाला साफ झिडकारले. बिहारात ओवेसी यांनी जे उपद्व्याप केले त्यामुळे तेजस्वी यादव यांचा अगदी निसटता पराभव झाला. ओवेसी यांनी धर्मांधतेचा थयथयाट केला नसता तर बिहारात तेजस्वी यादव या तरुणाच्या हाती सत्तेची सूत्रं गेली असती, पण धर्मांधतेचा आधार घेत मतविभागणी घडवायचीच व विजय विकत घ्यायचा हे व्यापारी धोरण एकदा ठरले की, दुसरे काय घडायचे! पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत जाऊन धर्मांधता, दहशतवाद, फुटीरतावाद वगैरेंवर जोरदार भाषण केले व त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, पण त्याच वेळी आपल्याच देशात ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे दिले जातात यास काय म्हणायचे? मोदी, योगींसारखे प्रखर राष्ट्रभक्त हिंदुत्ववादी नेते राज्यात व देशात सत्तेवर आहेत याचा ‘पाकिस्तान झिंदाबाद’वाल्यांना विसर पडला आहे.

निदान निवडणूक काळात तरी अशा घोषणांची बांगबाजी वाढावी, त्यातून हिंदू-मुसलमान, हिंदुस्थान-पाकिस्तान अशा शिळय़ा कढीस ऊत आणून धार्मिक तणाव वाढावा असे कारस्थान नेहमीप्रमाणे रचले जात आहे. या युद्धात पुन्हा काही जणांची डोकी फुटतील, रक्त सांडवले जाईल. निवडणुकांचा हा असा लोकशाहीवादी खेळ सुरूच राहील. रायबरेलीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा म्हणजे राष्ट्रभक्तांच्या छातीवर केलेले वार आहेत. ओवेसी व त्यांच्या एम.आय.एम. पक्षाचे नक्की ध्येयधोरण काय आहे? मुसलमानांवरील अन्यायाचा डंका पिटत हे महाशय देशभर फिरत आहेत. त्यांच्या राजकारणाचे प्रायोजकत्व कोणी वेगळेच लोक करीत असावेत.

देशातील मुसलमान शहाणा झाला आहे. त्याला आपले हित कशात आहे हे आता समजू लागले आहे. ‘ओवेसी’सारख्यांना येथील मुसलमान नेता मानायला तयार नाहीत. ओवेसी किंवा त्यांच्यासारखे पुढारी आतापर्यंत अनेकदा निर्माण झाले व काळाच्या ओघात नष्ट झाले. मुस्लिमांनी राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय त्यांना त्यांचे हक्क, प्रतिष्ठा मिळणार नाही हे सांगण्याचे धाडस ओवेसी यांच्यासारखे नेते दाखविणार नसतील तर आतापर्यंत मतविभागणी करून आपल्या सुपारीबाज मायबापांना मदत करणाऱ्यांपैकी एक असेच ओवेसींचे नेतृत्व राहील. 

Web Title: shiv sena saamna editorial criticize asaduddin owaisi bjp over election rallies uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.