शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 01:49 PM2021-12-05T13:49:21+5:302021-12-05T13:51:35+5:30

राज्यसभेतील निलंबनाच्या कारवाईनंतर शिवसेना खासदार चतुर्वेदींचं उपराष्ट्रपतींना पत्र

shiv sena mp Priyanka Chaturvedi resigns as anchor of Sansad TV show after suspension from Rajya Sabha | शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा; उपराष्ट्रपतींना पत्र, अँकरपद सोडलं

Next

नवी दिल्ली: राज्यसभेत गदारोळ केल्यानं १२ खासदारांना निलंबित करण्यात आलं. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, तृणमूल आणि डाव्या पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर चतुर्वेदींनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. गुन्हेगारांना स्वत:ची बाजू मांडण्याची संधी मिळते. पण आम्हाला तीदेखील मिळाली नाही, अशा शब्दांत चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली. 

आता खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे. चतुर्वेदी सांसद टीव्हीच्या अँकर आहेत. राज्यसभेतून निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी अँकरपदाचा राजीनामा दिला आहे. 'सांसद टीव्हीच्या मेरी कहानी कार्यक्रमाच्या अँकर पदावरून मी पायउतार होत आहे. संसदीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनमानीपणे १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. मी खासदार म्हणून माझ्या कामाबद्दल कटिबद्ध आहे, तितकीच मी कार्यक्रमातील जबाबदाऱ्यांबद्दलदेखील कटिबद्ध आहे. त्यामुळे मी त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे,' असं चतुर्वेदींनी उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात १२ खासदारांविरोधात कारवाई
राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. पावसाळी अधिवेशनात घातलेल्या गोंधळामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीएम आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे.

पावसाळी अधिवेशनात काय घडलं होतं?
११ ऑगस्टला विमा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलावण्याची वेळ आली. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचं मंदिर अपवित्र झाल्याचं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यावेळी म्हटलं होतं. या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील कामकाज स्थगित करण्यात आली. लोकसभेत केवळ २१ टक्के, तर राज्यसभेत केवळ २८ टक्के कामकाज झालं. 

कोण कोण निलंबित?
१. एलामरम करीम (सीपीएम)
२. फुलो देवी नेताम (काँग्रेस)
३. छाया वर्मा (काँग्रेस)
४. रिपुन बोरा (काँग्रेस)
५. बिनय विश्वम (सीपीआय)
६. राजामणी पटेल (काँग्रेस)
७. डोला सेन (तृणमूल)
८. शांता छेत्री (तृणमूल)
९. सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस)
१०. प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)
११. अनिल देसाई (शिवसेना)
१२. अखिलेश प्रसाद सिंह (काँग्रेस)

Web Title: shiv sena mp Priyanka Chaturvedi resigns as anchor of Sansad TV show after suspension from Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.