Shatrughan Sinha's wife Poonam Sinha joins Samajwadi Party | शत्रुघ्न सिन्हांच्या 'होम मिनिस्टर' देणार गृहमंत्र्यांना टक्कर; राजनाथ सिंहांविरोधात लढणार  
शत्रुघ्न सिन्हांच्या 'होम मिनिस्टर' देणार गृहमंत्र्यांना टक्कर; राजनाथ सिंहांविरोधात लढणार  

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा यांच्या होम मिनिस्टर अशी लढत रंगणार आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी . पूनम सिन्हा यांनी आज एसपी नेत्या डिंपल यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला असून, समाजवादी पक्षाने त्यांना लखनौ येथून उमेदवारी जाहीर केली आहे. पूनम सिन्हा या १८ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

भाजापचे खासदार असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना बिहारमधील पाटणा साहिब येथून लोकसभेची उमेदवारीही जाहीर झाली आहे. त्यानंतर पूनम सिन्हा या लखनौ येथून लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेरीस पूनम सिन्हा यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. तसेच त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. दरम्यान, लखनौमध्ये भाजपाला पराभूत करणे शक्य व्हावे यासाठी काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार देऊ नये, असे आवाहन समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रविदास मेहरोत्रा यांनी केले आहे. 
  शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याने काँग्रेसकडून पूनम सिन्हा यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. लखनौमध्ये सुमारे तीन ते साडेतीन लाख कायस्थ मतदार आहेत. तसेच सुमारे सव्वा लाख सिंधी मतदार आहेत. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना लखनौ येथून उमेदवारी देण्यात यावी, असा सल्ला सपाच्या काही नेत्यांनी दिला होता. 

दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि लखनौचे विद्यमान खासदार राजनाथ सिंह यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजनाथ सिंह हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. पूनम सिन्हा यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता राजनाथ सिंह म्हणाले की, ''कुणीतरी विरोधात निवडणूक लढवलीच पाहिजे.  हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे.''  

Web Title: Shatrughan Sinha's wife Poonam Sinha joins Samajwadi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.