हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 12:43 IST2025-12-07T12:41:59+5:302025-12-07T12:43:23+5:30
एक तरुणी तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडली आहे. आपलं घर सोडून ती सहारनपूरला आली.

हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून प्रेमप्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाहजहानपूरमधील एक तरुणी तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडली आहे. आपलं घर सोडून ती सहारनपूरला आली. तिच्या शोधात तिची आई आणि चुलत भाऊही सहारनपूरला पोहोचले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
सहारनपूरच्या मंडी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या घटनेने पोलीस आणि स्थानिकांना मोठा धक्का बसला. शाहजहानपूरमधील कौशिकी ही तरुणी अचानक सहारनपूरच्या खटाटखेडी येथील शमाच्या घरी पोहोचली. विशेष म्हणजे, शमा ही तीन मुलांची आई आहे आणि दोघीही गेल्या पाच वर्षांपासून एकमेकींच्या प्रेमात असल्याचा दावा करत आहेत. मुलीचं कुटुंब येताच एक हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला.
माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात आणलं. कौशिकीने पोलिसांना सांगितलं की ती केमिस्ट आहे आणि पाच वर्षांपूर्वी ऑनलाइन जॉब प्लॅटफॉर्मद्वारे शमाला भेटली होती. त्या दोघीही एकाच कंपनीत काम करत होत्या. त्यांची मैत्री झाली आणि हे नाते हळूहळू प्रेमात बदललं. कौशिकीचा दावा आहे की मार्चमध्ये त्या १५ दिवस एकत्र ट्रिपवर गेल्या होत्या, जिथे त्या पती-पत्नीसारख्या राहिल्या.
कौशिकीला शमासोबत तिचा "पती" म्हणून राहायचं आहे. कौशिकीने गंभीर आरोप केले आहेत की, १५ दिवसांनी ती घरी परतली तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला मारहाण केली, मानसिक छळ केला आणि जबरदस्तीने तिला मानसिक रुग्णालयात दाखल केलं. आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती थेट सहारनपूरला परतली आणि शमाच्या घरी पोहोचली.
कौशिकीच्या आईचा आरोप आहे की, शमाने तिच्या मुलीचं ब्रेनवॉश केलं आहे. याच दरम्यान शमाच्या पतीने सांगितलं की तो त्याची पत्नी आणि तीन मुलांना त्याच्यासोबत ठेवू इच्छितो, परंतु शमा आणि कौशिकी या दोघीही एकत्र राहण्यावर ठाम आहेत. पोलीस दोघींची चौकशी करत आहेत. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.