Second Vande Bharat Express likely from August, Delhi to Katra in only 8 hours | वैष्णो देवीच्या भक्तांसाठी खूशखबर, दिल्ली-कटारा मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस!
वैष्णो देवीच्या भक्तांसाठी खूशखबर, दिल्ली-कटारा मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस!

नवी दिल्ली : माता वैष्णो देवीच्या भक्तांसाठी एक खूशखबर आहे. देशातील सर्वात अत्याधुनिक आणि वेगवान एक्स्प्रेस दिल्ली ते कटारा मार्गावर धावणार आहे. पुढील महिन्यापासून दिल्ली ते कटारा मार्गावर वंदे भारत चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याचे समजते. 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली ते कटरा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. माता वैष्णो देवीच्या यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दिल्ली-कटारा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

130 किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दिल्ली ते कटरा हे अंतर केवळ 8 तासांचे होणार आहे. सध्याच्या स्थितीत हे अंतर कापण्यासाठी 12 तासांचा कालावधी लागतो. तसेच, वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केल्यानंतर यात्रेकरुंच्या मागणीनुसार आणखी फेऱ्या वाढविण्यात येतील, असेही सुत्रांनी सांगितले. 

दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस सुरुवातीला आठवड्याला सोमवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे. त्यानंतर यात्रेकरुंची मागणी लक्षात घेऊन आठवड्यातील पाच दिवस सुरु करण्यात येईल. वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते कटरा स्थानकापर्यंत तीन महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. दिल्ली नंतर अंबाला जंक्शन, लुधियाना, जम्मू नंतर कटरा पोहोचणार आहे.  

(वंदे भारत एक्स्प्रेसचा वेगळाच असेल थाट! ही वैशिष्ट्ये आहेत खास)

वंदे भारत एक्स्प्रेस ची वैशिष्ट्ये....
- 'मेक इन इंडिया' योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.
- चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी १८० किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते.
- कितीही वेगानं धावली तरी प्रवाशानं भरून ठेवलेली पाण्याची बाटलीही कलंडणार नाही, इतकी या रेल्वेची स्थिरता असेल, असा दावा करण्यात आलाय.
- १६ डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे.
- या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल.
- या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल.
- रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालये. 
- रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि 'अ‍ॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स' असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल.
- रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील.
- जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल.
- प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील.
- सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील.
- ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.
- आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल.
- रेल्वेत १६ चेअरकार डबे असतील. त्यातील १४ डबे 'नॉन एक्झिक्युटिव्ह' तर दोन डबे 'एक्झिक्युटिव्ह' असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे ७८ आणि ५६ असेल.
- 'एक्झिक्युटिव्ह' क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल.

 


Web Title: Second Vande Bharat Express likely from August, Delhi to Katra in only 8 hours
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.