पंजाबमधील ग्रामस्थांनी उभारला स्वखर्चाने सावित्रीबाई फुलेंचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:32 PM2019-04-09T12:32:43+5:302019-04-09T12:33:29+5:30

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी पुतळा पंजाबमधील एका गावात स्वखर्चाने उभारण्यात आला आहे.

Savitribai Phule Gets A Statue In Punjab by the villagers | पंजाबमधील ग्रामस्थांनी उभारला स्वखर्चाने सावित्रीबाई फुलेंचा पुतळा

पंजाबमधील ग्रामस्थांनी उभारला स्वखर्चाने सावित्रीबाई फुलेंचा पुतळा

Next

चंदीगड - भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी पुतळा पंजाबमधील एका गावात स्वखर्चाने उभारण्यात आला आहे. स्त्री शिक्षणाबाबत लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी पंजाब राज्यातील मानसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत गावकऱ्यांनी व शिक्षकांनी स्वखर्चाने सावित्रीबाईंचा पुतळा उभारला आहे. 

मानसा जिल्ह्यातील  साड्डा सिंग वाला या गावात सावित्रीबाईंच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी एक पार्क उभं करण्यात आले आहे. गणित थीमवर आधारित असलेल्या या पार्कमध्ये केंद्रस्थानी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यादगरी पार्क असं या पार्कला नाव देण्यात आलं आहे. मुलींच्या शिक्षणासाठी, दलितांच्या हक्कासाठी, विधवा पुनर्विवाहासाठी आणि बालविवाहाविरोधात लढा देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या स्मरणार्थ आणि त्यांनी समाजाला जागृत करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी हे पार्क उभारण्यात आलं आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांचे योगदान त्यांची प्रेरणा पंजाबमधील लोकांनाही मिळावी याच उद्देशाने या पार्कचे निर्माण करण्यात आल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक अमलाक सिंग यांनी सांगितले. 

या पुतळ्याच्या बाजूला ‘सावित्रीबाईंना आपण कायमच लक्षात ठेवणे का गरजेचे आहे?’ अशा मथळ्याचा फलक असून त्याखाली पंजाबी भाषेत सावित्रीबाईंची माहिती देण्यात आली आहे.  हा पुतळा उभारण्यासाठी एकूण 52 हजारांचा खर्च आला. ही रक्कम शाळेतील शिक्षक आणि स्थानिकांनी वर्गणी गोळा करून जमा केली. या संपूर्ण पार्कसाठी एक लाख 70 हजारांचा खर्च आला. कोणत्याही सरकारी मदतविना हा निधी गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी उभारला आणि दिल्लीतील एका कारागिरामार्फत सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्यात आला. या गावातील शाळेमधील एकूण पटसंख्या 128 असून त्यापैकी 70 विद्यार्थिनी आहे. या शाळेत एकूण सात शिक्षक असून त्यापैकी तीन महिला शिक्षक आहेत. सर्व शिक्षिका या कंत्राटीपद्धतीवर दर महिन्याला पाच हजार रुपये पगारावर कामाला आहेत 

ज्यांच्यामुळे महिलांना अनेक क्षेत्रात आज मान-सन्मान मिळत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात महिला यश प्राप्त करत आहे. देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा इतिहास उत्तर भारतातील राज्यांमध्ये राहणाऱ्यांना माहिती नाही हे दुर्दैवी आहे अशी खंत अमलाक सिंग यांनी व्यक्त केली. 

Web Title: Savitribai Phule Gets A Statue In Punjab by the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.