The result of air strikes! Great fall in intrusion by the border | एअरस्ट्राइकचा परिणाम! सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट
एअरस्ट्राइकचा परिणाम! सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट

नवी दिल्ली -  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राइक करून बदला घेतला होता. दरम्यान, बालाकोट येथील एअर स्ट्राइकमुळे दहशतवादी कारवायांना चांगलाच आळा बसला असून, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट झाली असल्याचे केंद्र सरकारकडून आज लोकसभेत सांगण्यात आले. 

गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत लोकसभेत माहिती दिली. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. तसेच एअर स्ट्राइकनंतर घुसखोरीमध्ये 43 टक्क्यांनी घट झाली आहे,'' असे त्यांनी सांगितले. एका दिवसापूर्वीच भारताच्या कारवाईमुळे धास्तावलेल्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून अफगाणिस्तानच्या सीमेमध्ये कूच केल्याचे वृत्त आले होते.

 जम्मू काश्मीरमधील घुसखोरीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मंगळवारी लोकसभेत  उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने हल्ला करून दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. तसेच संरक्षण दलांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत झीरो टॉलरेन्सचे धोरण अवलंबलेले आहे. एवढेच नाही केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून घुसखोरी रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.  


Web Title: The result of air strikes! Great fall in intrusion by the border
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.