रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची कोविड गंगाजळी योजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 01:34 AM2021-05-08T01:34:46+5:302021-05-08T01:35:07+5:30

या निधीतून बँकांना केवळ कोविडशी संबंधित पायाभूत सोयींची उभारणी, औषधी/उपकरणांचे उत्पादन आणि सेवा यांसाठीच कर्ज देता येईल.

RBI launches Rs 50,000 crore Kovid Gangajali scheme | रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची कोविड गंगाजळी योजना सुरू

रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची कोविड गंगाजळी योजना सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांसाठी जाहीर केलेली ५० हजार कोटी रुपयांची गंगाजळी योजना शुक्रवारी तातडीने कार्यान्वित करण्यात आली. याबाबतचे परिपत्रक  रिझर्व्ह बँकेने जारी केले आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ५ मे रोजी या सुविधेची घोषणा केली होती. ‘टॅप ऑन टर्म लिक्विडिटी फॅसिलिटी’ असे या योजनेचे नाव आहे. ती मुक्तपणे उपलब्ध असणार आहे.  या योजनेअंतर्गत व्यावसायिक बँकांना खास ५० हजार कोटी रुपयांची गंगाजळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत असून बँकांना रेपो दराने हा निधी उपलब्ध होईल. 

या निधीतून बँकांना केवळ कोविडशी संबंधित पायाभूत सोयींची उभारणी, औषधी/उपकरणांचे उत्पादन आणि सेवा यांसाठीच कर्ज देता येईल. कोविड लसीचे उत्पादक, लसीचे आयातदार/पुरवठादार, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, डायग्नोस्टिक सेंटर्स, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सचे 
उत्पादक/ पुरवठादार आणि कोविडशी संबंधित इतर औषधांचे उत्पादक व आयातदार इत्यादींना या कर्जाचा लाभ मिळेल. 
यासाठी बँका ई-मेलद्वारे निधीची मागणी नोंदवू शकतील. आठवडाभरातील मागणीवर रिझर्व्ह बँक दर सोमवारी निधीचे वितरण करेल. ५० हजार कोटींचा निर्धारित निधी संपल्यानंतर बँकांची मागणी पूर्ण केली जाण्याची शक्यता नाही. 

बँकांना ठेवता येणार अतिरिक्त निधी
या योजनेत झटपट कर्जे देणाऱ्या बँकाना प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे. बँका थेट लाभधारकास कर्ज देऊ शकतील तसेच मध्यस्थ वित्तीय संस्थामार्फतही कर्ज देऊ शकतील. या योजनेद्वारे मिळणाऱ्या निधीतून बँकांनी स्वतंत्र ‘कोविड कर्ज खाते’ (कोविड लोन बुक) तयार करावे, अशी अपेक्षा आहे. ही योजना चालविणाऱ्या बँकांना आपल्या ‘कोविड कर्ज खात्या’एवढा अतिरिक्त निधी रिझर्व्ह बँकेकडे ‘रिव्हर्स रेपो विंडो’च्या माध्यमातून ठेवता येईल. त्यावर रिझर्व्ह बँक त्यांना जे व्याज देईल, ते रेपोदरापेक्षा ०.२५ टक्क्यांनी कमी असेल.

Web Title: RBI launches Rs 50,000 crore Kovid Gangajali scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.