Ramlala argues at Ayodhya hearing in Supreme Cout | राम जन्मस्थानाच्या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलू नये, अयोध्या सुनावणीत रामलल्लाचा युक्तिवाद
राम जन्मस्थानाच्या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलू नये, अयोध्या सुनावणीत रामलल्लाचा युक्तिवाद

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे व पूर्वीचे मंदिर पाडून तेथे नंतर मशीद बांधली गेली ही हिंदूंची पूर्वापार चालत आलेली दृढ श्रद्धा आहे व या श्रद्धेला तर्काच्या तराजूत तोलता येणार नाही, असा युक्तिवाद तेथील रामलल्ला विराजमान या देवतेच्या वतीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला गेला.

वादग्रस्त २.७७ एकर जागेची तीन समान भागात वाटणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केल्या गेलेल्या अपिलांवरील सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील विशेष घटनापीठापुढे सुरू असलेली दैनंदिन सुनावणी सहाव्या दिवशीही अपूर्ण राहिली. बुधवारचा संपूर्ण दिवस मूळ दाव्यातील रामलल्ला या एका पक्षकाराच्या वतीने ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांचा युक्तिवाद झाला.

वादग्रस्त जागा हीच रामजन्मभूमी आहे, याला पुरावे काय, ही न्यायालयाची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी अ‍ॅड. वैद्यनाथन यांनी अनेक जुन्या ग्रंथांचे आणि खास करून १६ व १७ व्या शतकात भारतात येऊन गेलेल्या विल्यम फिन्च, ब्रिटिश सर्व्हेअर मॉन्टेगोमेरी मार्टिन व जेजुईटी मिशनरी जोसेफ टिफेनथॅलर युरोपीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनांचे दाखले दिले. अयोध्येतील रामजन्मस्थानाचे उल्लेख पुराणांमध्येही आढळतात, असे त्यांनी सांगितले. वैद्यनाथन यांनी स्पष्ट केले की, हे सर्व पुरावे दाखविण्यामागे श्री राम तेथेच जन्मला याला पुष्टी देण्यासाठी नव्हे तर हिंदूंची तशी पूर्वापार श्रद्धा आहे हे अधोरेखित करणे हाच उद्देश आहे. त्यावरून या श्रद्धेचे पुरातन स्वरूप स्पष्ट होते. ही श्रद्धा वस्तुस्थिती म्हणून मान्य करावी लागेल. ती तर्काच्या तागडीत तोलता येणार नाही.

वैद्यनाथन यांनी असेही सांगितले की, आता उद््ध्वस्त झालेल्या बाबरी मशिदीच्या तीन घुमटांच्या नेमके खाली रामजन्मस्थान होते व पूर्वी त्या ठिकाणी मंदिर होते, अशीही हिंदूंची श्रद्धा आहे. ही श्रद्धा ऐकीव माहितीवर आधारलेली व पूर्णपणे निराधार म्हणता येणार नाही. कारण मशिदीचे अनेक खांब व कमानींवर कोरलेली नक्षी हिंदू शैलीची होती याचे अनेक समकालीन दाखले मिळतात.

वैद्यनाथन यांच्या या युक्तिवादाच्या अनुषंगाने न्यायमूर्तींशी त्यांचे झालेले काही सवाल- जबाब असे :
न्यायमूर्ती : या जागेचा ‘बाबरी मशीद’ असा उल्लेख सर्वप्रथम केव्हा केल्याचे आढळते.
वैद्यनाथन : तसा उल्लेख १९ व्या शतकात केला गेल्याचे आढळते. त्याआधी या स्थानाला बाबरी मशीद म्हणून ओळखले जात असल्याचे उल्लेख नाहीत.

न्यायमूर्ती : बाबर बादशहाने लिहिलेल्या ‘बाबरनाम्या’तही याचा अजिबात उल्लेख नाही?
वैद्यनाथन : नाही. अजिबात नाही.
न्यायमूर्ती : मग बाबराने मंदिर पाडून तेथे मशीद बांधविली, याला वस्तुनिष्ठ पुरावा काय?
वैद्यनाथन : बाबर बादशाहने त्याचा सेनापती मलिक अंबर यास मशीद उद््ध्वस्त करण्याचा आदेश दिला, याचा उल्लेख आहे.
च्न्यायमूर्ती : मंदिर बाबरानेच पाडले कशावरून?
च्वैद्यनाथन : मंदिर बाबराने किंवा औरंगजेबाने पाडले असे दोन प्रवाद आहेत; पण ते सन १७८६ पूर्वी पाडले गेले एवढे नक्की.


 


Web Title:  Ramlala argues at Ayodhya hearing in Supreme Cout
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.