Rahul says terrible situation of farmers; Rajnath counters | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक, सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक, सरकारवर हल्लाबोल

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून गुरुवारी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.केरळमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून गुरुवारी (11 जुलै) त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. वायनाडमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. तसेच वायनाडमधील 8 हजार शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम न भरल्याचे सांगत बँकेने नोटीस पाठवली. तसेच अनेकांच्या जमिनी जप्त करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

केरळमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारने 5.5 लाख कोटी रूपयांचे मोठ्या व्यावसायिकांचे कर्ज माफ केले. सरकार अशी दुहेरी भूमिका असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 


राहुल गांधी यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. तसेच यावेळी केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची विनंती सरकारने करावी. कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवून बँकांनी त्रास देऊ नये, यावरदेखील सरकारने लक्ष द्यावे' असेही म्हटलं आहे. 


सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी सध्या देशातील शेतकऱ्यांवर जी बिकट स्थिती ओढावली आहे ती आतापासून नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी सरकार चालवले त्यांच्यामुळेच झाली असल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहे. अनेक पिकांचे हमीभाव वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यातही 6 हजार रूपये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 


कर्नाटकात निर्माण झालेल्या या स्थितीचा विरोध करण्यासाठी गुरुवारी सकाळीकाँग्रेसने संसद परिसरात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर मोठे नेतेही सहभागी झाले होते. कर्नाटकपाठोपाठ गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरही काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.


 


Web Title: Rahul says terrible situation of farmers; Rajnath counters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.