‘’बिहारची निवडणूक सुरू असताना राहुल गांधी बहिणीच्या घरी पिकनिक करत होते’’ आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

By बाळकृष्ण परब | Published: November 16, 2020 08:09 AM2020-11-16T08:09:39+5:302020-11-16T08:13:01+5:30

Shivanand tiwari Criticize Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने बिहारमधील पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.

"Rahul Gandhi was having a picnic at his sister's house during the Bihar elections," said a senior RJD leader Shivanand Tiwari | ‘’बिहारची निवडणूक सुरू असताना राहुल गांधी बहिणीच्या घरी पिकनिक करत होते’’ आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

‘’बिहारची निवडणूक सुरू असताना राहुल गांधी बहिणीच्या घरी पिकनिक करत होते’’ आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

Next
ठळक मुद्देबिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होतेसध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहेकाँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या निकालांचे आफ्टरशॉक्स आता जाणवू लागले आहेत. एकीकडे भाजपा पुन्हा सत्तेत आल्यानंतर सुशील कुमार मोदी यांची बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाने बिहारमधील पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. बिहारमधील निवडणूक सुरू असताना राहुल गांधी हे सिमला येथे बहिणीच्या घरी पिकनिक करत होते, अशी टीका आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी केला आहे.

बिहारमध्ये आरजेडीचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या एकंदरीत मानसिकतेवर शिवानंद तिवारी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असा आरोपही तिवारी यांनी केला.  



शिवानंद तिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, महाआघाडीसाठी काँग्रेस ही  बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती.

शिवानंद तिवारी म्हणाले की, माझ्या मते ही बाब केवळ बिहारपुरती मर्यादित नाही. इतर राज्यांमध्ये सुद्धा अधिकाधिक जागांवर लढण्याचा काँग्रेसचा आग्रह असतो. मात्र अधिकाधिक जागा जिंकण्यात ते अपयशी ठरतात. आता काँग्रेसने त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, शिवानंद तिवारी यांनी केलेल्या टीकेनंतर त्याचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. भाजपाचे नेते किरेन रिजिजू यांनी शिवानंद तिवारी यांनी केलेल्या टीकेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १२५ जागा जिंकत विजय मिळवला. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ११० जागांवर समाधान मानावे लागले. आता महाआघाडीला आलेल्या अपयशामध्ये काँग्रेसची निराशाजनक कामगिरी ही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत लढवलेल्या एकूण ७० जागांपैकी केवळ १९ जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला होता.

 

Web Title: "Rahul Gandhi was having a picnic at his sister's house during the Bihar elections," said a senior RJD leader Shivanand Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.