"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:55 IST2025-12-09T17:53:24+5:302025-12-09T17:55:41+5:30
Rahul Gandhi RSS, Winter Session Parliament: राहुल गांधी यांचे संसदेत भाषण सुरु असताना गोंधळ सुरु झाला

"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
Rahul Gandhi RSS, Winter Session Parliament: मतदार यादीतील घोळ आणि त्याच्या सुधारणा यावरील लोकसभेच्या अधिवेशनाच्या विशेष चर्चेदरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेत म्हटले की, आरएसएसला समानतेच्या संकल्पनेबद्दल अडचणी आहेत आणि त्यांनी संवैधानिक संस्थांवर कब्जा केला आहे. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना बोलताना थांबवले आणि मतदार याद्यांमधील सुधारणांवर चर्चा करण्यास सांगितले. तसेच, LoP (एलओपी) विरोधी पक्षनेता असण्याचा असा अर्थ होत नाही की, तुम्ही तुमच्या मनाला येईल ते बोलू शकता. तुम्ही पदाचा मान राखला पाहिजे.
खादीचा उल्लेख करत भाषणाला सुरुवात
राहुल गांधी यांनी चर्चेच्या सुरुवातीला खादीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आपला देश एका कापडासारखा आहे. ज्याप्रमाणे कापड अनेक धाग्यांपासून बनलेले असते, तसेच आपला देशही अनेक लोकांपासून बनलेला आहे. देशातील कपडे हे आपल्या देशाचे प्रतिबिंब आहेत. देशातील सर्व धागे समान आणि महत्त्वाचे आहेत. देशातील सर्व लोक समान आहेत. त्यानंतर राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करायला सुरुवात केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्यांना मध्येच थांबवले.
RSS वर टीकास्त्र
राहुल गांधी यांनी संघाचे नाव घेताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही यावर आक्षेप घेतला. तरीही राहुल गांधी पुढे बोलतच राहिले. ते म्हणाले, "मी काहीही चुकीचे बोललो नाही. शैक्षणिक संस्था ताब्यात घेतल्या आहेत. कुलगुरूंची नियुक्ती गुणवत्तेवर नव्हे, तर एका संस्थेशी संलग्नतेवर आधारित करण्यात आली आहे. CBI आणि ED एकाच संस्थेशी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेत आहेत. देशातील निवडणुकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेला दुसऱ्या संस्थेकडून नियंत्रित केले जात आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधींना सुनावलं
अखेर लोकसभा अध्यक्षांनी राहुल यांना सुनावले. ओम बिर्ला म्हणाले, "विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता. तुम्ही निवडणूक सुधारणांवर चर्चा करा." दरम्यान, यामुळे संसदेत एकच गोंधळ उडाला. किरेन रिजिजू म्हणाले, "आम्ही मुद्दे ऐकण्यासाठी आलो आहोत. निवडणूक सुधारणांवर भाष्य करणे जास्त उचित ठरेल. सरकार निवडणूक सुधारणांसाठी तयार आहे. त्यावर बोलावे."