Rafale Deal: ख्रिश्चिअन मिशेलला होऊ द्यायचा नव्हता राफेल करार; 'लॉबिंग'चे पुरावे सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 12:23 PM2019-01-07T12:23:05+5:302019-01-07T12:24:34+5:30

इटलीतील एक मध्यस्थ गुईडो हॅशके (Guido Haschke) आणि मिशेल हे दोघे मिळून यूरोफायटर टायफून विमानांसाठी लॉबिंग करत होते, याचे पुरावे हॅशकेच्या घरातून सापडले आहेत. 

Rafale Deal: Christian Michel was 'lobbying' for eurofighter typhoon | Rafale Deal: ख्रिश्चिअन मिशेलला होऊ द्यायचा नव्हता राफेल करार; 'लॉबिंग'चे पुरावे सापडले

Rafale Deal: ख्रिश्चिअन मिशेलला होऊ द्यायचा नव्हता राफेल करार; 'लॉबिंग'चे पुरावे सापडले

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा केला आहे, अनिल अंबानींच्या खिशात ३० हजार कोटी रुपये घातले, तसंच विमानांची संख्या कमी करून किंमत वाढवली, असे आरोप काँग्रेसकडून अगदी रोज होत आहेत. मोदींचे मंत्री आणि भाजपाचे नेते हे आरोप फेटाळून लावत आहेत. काँग्रेसने केलेल्या घोटाळ्यांकडे बोट दाखवून राहुल गांधींवर निशाणा साधत आहेत. ही शाब्दिक चकमक गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगली असताना, राफेल कराराशी संबंधित एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी चॉपर खरेदी प्रकरणातील मध्यस्थ ख्रिश्चिअन मिशेल, भारताने राफेल विमानं खरेदी करू नयेत, यासाठी जोरदार प्रयत्न करत होता, अशी माहिती 'इंडिया टुडे'च्या हाती लागली आहे. इटलीतील एक मध्यस्थ गुईडो हॅशके (Guido Haschke) आणि मिशेल हे दोघे मिळून यूरोफायटर टायफून विमानांसाठी लॉबिंग करत होते, याचे पुरावे हॅशकेच्या घरातून सापडले आहेत. 

१२६ मीडियम मल्टी रोल एअरक्राफ्ट खरेदी करण्याचा मानस भारताने २००७ मध्ये व्यक्त केल्यानंतर अनेक कंपन्यांनी निविदा दिल्या होत्या. फ्रान्सच्या राफेलसमोर पाच कंपन्यांचं आव्हान होतं. पण, २०११ पर्यंत फक्त दोनच कंपन्या उरल्या होत्या. एक होती, दसॉल्ट राफेल आणि दुसरी यूरोफायटर टायफून. त्यात मिशेल-हॅशके जोडी 'टायफून'च्या बाजूने होती, असं गुईडो हॅशकेच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रांमधून स्पष्ट होतं. 

यूरोफायटर विमानं यूके, जर्मनी, इटली आणि स्पेनमधील बहुराष्ट्रीय कंपनी बनवते. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर बनवणाऱ्या इटलीतील Finmeccanica कंपनीचे यूरोफायटर कन्सॉटियममध्ये २१ टक्के समभाग आहेत, ही विशेष लक्षवेधी बाब आहे. 

'या कामासाठी फक्त तीन दावेदार आहेत, त्यातला एकच उपलब्ध आहे. नेत्यांसोबतच एअरफोर्सच्या तीन अधिकाऱ्यांना - चीफ ऑफ एअर कमांड, एअर ऑफिसर मेन्टेनन्स आणि चीफ ऑफ इंजिनीअरिंग - 'पटवावं' लागेल', असा संभाषण मिशेल-हॅशकेमध्ये झालं होतं. हा खुलासा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो. 

राफेल करारावर बुधवारी लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यूरोफायटर टायफून विमानांवरून काँग्रेसला टोला लगावला होता. काँग्रेसनं मोदी सरकारवर केलेल्या आरोपांना जेटली उत्तरं देत असताना, काँग्रेसचे काही खासदार सभागृहात कागदी विमानं उडवत होते. तेव्हा, ही विमानं बहुतेक 'यूरोफायटर'च्या आठवणीत उडवली जात आहेत, अशी टिप्पणी जेटलींनी केली होती.  

Web Title: Rafale Deal: Christian Michel was 'lobbying' for eurofighter typhoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.