भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 10:36 IST2025-12-07T10:33:51+5:302025-12-07T10:36:29+5:30
एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत-चीनमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी सीमा भागात शांतता आणि स्थैर्य आवश्यक असून ते राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दोन देशांच्या संबंधात शांततेबरोबर इतर अनेक मुद्देही महत्त्वाचे आहेत.

भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
नवी दिल्ली : भारताच्या अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटींवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दौऱ्यामुळे कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही असेही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी ठामपणे सांगितले. ७० ते ८० वर्षांपासून दोन देशांमध्ये उत्तम संबंध टिकून राहिले अशा उदाहरणांमध्ये भारत-रशिया मैत्रीचा समावेश होतो, असेही ते म्हणाले.
जयशंकर यांनी सांगितले की, पुतीन यांच्या भारत भेटीमध्ये दोन्ही देशातील व्यापार, आर्थिक उलाढाल वाढविण्यावर भर देण्यात आला. एका प्रसारमाध्यम समुहाने दिल्ली येथे आयोजिलेल्या समारंभात ते म्हणाले की, भारताचे जगातील सर्व प्रमुख देशांशी उत्तम संबंध आहेत. आम्ही कोणाशी मैत्री करावी किंवा करू नये याबद्दल एखाद्या देशाने मत बाळगणे किंवा तशा सूचना करणे अयोग्य आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचे सर्व लक्ष व्यापारावर केंद्रित झाले आहे, तर भारताचा दृष्टिकोन राष्ट्रहित जपणे याकडे अधिक आहे.
‘सीमेवर शांतता असणे आवश्यक’
एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत-चीनमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी सीमा भागात शांतता आणि स्थैर्य आवश्यक असून ते राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दोन देशांच्या संबंधात शांततेबरोबर इतर अनेक मुद्देही महत्त्वाचे आहेत.
‘कामगार, शेतकरी, लघु उद्योगांचे रक्षण करणार’
रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लागू केले. त्या पार्श्वभूमीवर एस. जयशंकर म्हणाले की, भारतातील कामगार, शेतकरी, लघु उद्योग व मध्यमवर्गाच्या हिताचे रक्षण करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे.
या सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच अमेरिकेसोबत व्यापार कराराबाबत बोलणी सुरू आहेत. भारत व रशियाचे संबंध अतिशय उत्तम आहेत. रशियानेही चीनसोबतच्या संबंधात काही चढउतार अनुभवले आहेत.
‘भारतातील घातपातामागे पाकिस्तानी लष्कराचा हात’
पाकिस्तानच्या आर्मी चीफ फील्ड मार्शल असिम मुनिर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जयशंकर म्हणाले की, भारतासमोर विविध अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान दहशतवादी गटांना पाठिंबा तसेच मदतही पुरवितो. बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या विशिष्ट परिस्थितीमुळे तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आल्या. पुढे काय करायचे याचा निर्णय त्याच घेतील, असे ते म्हणाले.