Punjab Assembly Election: पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:44 AM2022-01-22T06:44:05+5:302022-01-22T06:45:09+5:30

काँग्रेस आणि आप यांच्यातच थेट लढत असून भाजप या ठिकाणी नगण्य आहे.

Punjab Assembly Election What is the current situation in Punjab | Punjab Assembly Election: पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड?

Punjab Assembly Election: पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड?

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्याच्या मुद्द्यावरून भाजपशासित केंद्र सरकारने त्यावर मोठी आदळआपट केली. राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय इत्यादींपर्यंत प्रकरण नेण्यात आले. देशभरात रान माजविण्यात आले. या सर्व प्रकारामुळे हबकलेल्या काँग्रेसने नंतर हा तर पंजाबीयतचा अपमान असा पलटवार केला. विधानसभा निवडणुकीत हा मुद्दाच आता तापणार अशी चिन्हे आहेत. काँग्रेस आणि आप यांच्यातच थेट लढत असून भाजप या ठिकाणी नगण्य आहे.

'कॅप्टन'ला मिळणार कर्णधारपद? 
कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी वेगळी चूल मांडल्याने काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना किती पाठबळ मिळते हे मतदारच ठरवतील. 

 केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्याने शेतकरी आंदोलनाचा मुद्दा मागे पडला असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यातच अमरिंदरसिंग आणि सुखविंदरसिंग धिंडसा (संयुक्त शिरोमणी अकाली दल) यांच्याशी हातमिळवणी केल्याने चांगल्या कामगिरीची भाजपला अपेक्षा आहे.

चरणजीतसिंग चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात कोणताही वाद नाही. ते एकदिलाने काम करत आहेत, हे दर्शविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राज्यात असलेली सत्ता राखण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कमीतकमी बंडखोरी होईल आणि अधिकाधिक जागांवर उमेदवार विजयी होतील, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.

शहरी मतदारांत आपविषयी आकर्षण असले तरी त्याचे मतांत कितपत रुपांतर होईल, हा प्रश्न आहे. मात्र, तरी थेट लढत काँग्रेस आणि आप यांच्यातच होणार आहे, हे नक्की.

चर्चेतले चेहरे...
नवज्योतसिंग सिद्धू : पंजाबातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसमध्ये उडी मारणारे नवज्योतसिंग सिद्धू वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या छबीचा पक्षाला फायदा होईल, म्हणून त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. तसेच कॅप्टन अमरिंदरसिंग यांना काटशह देण्यासाठी म्हणूनही सिद्धू यांचे प्यादे पुढे करण्यात आले. अमरिंदर यांनी नाराज होऊन पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. आताही मुख्यमंत्री चन्नी यांना सिद्धू स्वस्थ बसू देत नसल्याचेच चित्र आहे.

चरणजितसिंग चन्नी : कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसश्रेष्ठींनी चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याच्या मुद्द्यावरून चन्नी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले असले तरी सुरुवातीला बॅकफूटला गेलेल्या चन्नी यांनी नंतर टीकाकारांना सडेतोड प्रश्न विचारले. त्यामुळे त्यांचे प्रतिमासंवर्धन झाले असले तरी पक्षाला त्याचा कितपत फायदा होतो, हे पहावे लागेल.

सुखबीरसिंग बादल : शिरोमणी अकाली दलाचे 
नेते असलेल्या बादल यांना ही निवडणूक भाजपच्या मदतीशिवाय लढवायची आहे. पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी बादल यांना राज्य पिंजून काढावे लागणार आहे. रोड शो आणि नुक्कड सभा यांच्या माध्यमातून बादल यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

भगवंत मान : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे संग्रुर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. 'पंजाब दा मान, सरदार भगवंत मान' असा प्रचार आता त्यांनी सुरू केला आहे. 

Web Title: Punjab Assembly Election What is the current situation in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.