Possible vaccine shortage in the country in the next few months | आगामी काही महिने देशात लस टंचाई शक्य - पुनावाला

आगामी काही महिने देशात लस टंचाई शक्य - पुनावाला

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : आगामी काही महिने भारताला कोरोनावरील लसीच्या टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता सीरम इन्स्टिटट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी बोलून दाखविली. सध्या सीरम इन्स्टिट्यूटची लस उत्पादनाची क्षमता दरमहा ६०-७० दशलक्ष असून, ती जुलै २०२१ पर्यंत १०० दशलक्ष मात्रा वाढविली जाईल, असे पुनावाला म्हणाले.

एका मुलाखतीत पुनावाला म्हणाले की, “या आधी मी लस उत्पादन क्षमता वाढविली नाही, कारण लसीसाठी ऑर्डर्सच नव्हत्या. संपूर्ण जुलै महिन्यात लसीची तीव्र टंचाई असू शकेल. ऑर्डर्स नव्हत्या त्यामुळे एका वर्षात आणखी एक अब्ज मात्रा बनविण्याची गरज असेल असा विचार आम्ही केला नव्हता. अधिकाऱ्यांना जानेवारीत दुसरी लाट येईल अशी अपेक्षा नव्हती.”  गेल्या महिन्यात केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला लस उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तीन हजार कोटी रुपये आगाऊ दिले. भारताने एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के म्हणजे १५.७० कोटी लोकांना लसीची पहिली मात्रा दिली, तर फक्त दोन टक्के लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. अदर पुनावाला म्हणाले की, “लसीच्या टंचाईबद्दल राजकीय नेते आणि टीकाकारांनी एसआयआयला लक्ष्य केले असले तरी लसीकरणाचे धोरण सरकारने ठरविले होते.” गेल्या १६ जानेवारी रोजी केंद्र सरकारने देशात लसीकरणास सुरुवात केली.

लस उत्पादन रात्रीतून वाढवता येत नाही

n    माझ्या काही वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावला गेल्यामुळे मी काही खुलासा करणे आवश्यक आहे, असे अदर पुनावाला म्हणाले. लस उत्पादन हे विशेष कौशल्याचे काम असून, ते एखाद्या रात्रीतून वाढवता येत नाही. 

n    भारताची प्रचंड लोकसंख्या विचारात घेता सर्व प्रौढांसाठी पुरेसी लस उपलब्ध करणे हे सोपे काम नाही. बरेचसे विकसित देश आणि कंपन्या तुलनेने कमी लोकसंख्या असतानाही संघर्ष् करीत आहेत. गेल्या वर्षी एप्रिलपासून आम्ही भारत सरकारसोबत काम करीत असून, आम्हाला वैज्ञानिक, आर्थिक आणि नियामक पातळीवर पाठिंबा मिळत आहे.

n    लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी, असे प्रत्येकाला वाटते. आमचाही तसाच प्रयत्न आहे. २६ कोटी मात्रांची ऑर्डर मिळाली असून, त्यातील १५ कोटींपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. उर्वरित ११ कोटी मात्रा येत्या काही महिन्यांत पुरवल्या जातील.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Possible vaccine shortage in the country in the next few months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.